शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची आता महापालिकेतील पक्ष कार्यालयात रोज हजेरी

223

मुंबई महापालिका बरखास्त झाल्यानंतर ७ मार्च २०२२ पासून सत्ताधारी पक्षाने महापालिकेकडे पाठ फिरवली. महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातही न फिरकणाऱ्या सत्ताधारी असलेल्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या नगरसेवकांनी आता पुन्हा या पक्ष कार्यालयात फिरकायला सुरुवात केली आहे. भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व माजी नगरसेवक मुख्यालयातील पक्ष कार्यालयात दररोज हजेरी लावून महापालिकेतील आपली कामे करत असल्याने शिवसेनेनेही आता राज्यातील सत्ता बदलानंतर महापालिकेत येवून बसत पहारेकऱ्याची भूमिक बजावण्याचा निर्धार केला आहे. यासाठी प्रत्येक शिवसेनेच्या नेत्यांना महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात येवून बसण्याचा फतवाच जारी केल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : मालाडमध्ये मलवाहिनी टाकण्याच्या कामांमध्ये मविआकडून आडकाठी : भाजप नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा )

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२रोजी संपुष्टात आल्याने नगरसेवकांचा महापालिकेतील वावर संपला. परंतु नियोजित वेळेत निवडणूक जाहिर न झाल्याने प्रशासकांची नियुक्ती महापालिकेत करण्यात आल्याने सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी केलेल्या विनंतीनुसार मानवतेच्यादृष्टीकोनातून महापालिकेतील पक्ष कार्यालय खुली ठेवण्यासप प्रशासनाने मान्यता दिली. तेव्हापासून शिवसेनेचे कार्यालय खुले असले तरी कोणताही नगरसेवक याठिकाणी येवून बसले नव्हते. त्यातुलनेत भाजपचे माजी गटनेत्यांसह पक्षनेते हे इतर नगरसेवक तसेच माजी विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या या आपल्या कार्यालयात बसून आपल्या नगरसेवकांच्या समस्या सोडवण्याचा किंबहुन नगरसेवकांच्या तक्रारींचे निवारण महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण शिवसेनेचे नगरसेवक आपल्या कार्यालयाचा वापरही करत नसल्याने शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रत्येक माजी नगरसेवकाला मुख्यालयातील या पक्ष कार्यालयात दुपारपासून बसण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

आमदार अनिल परब यांनी याबाबत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर ही जबाबदारी सोपवत माजी महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे,माजी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, माजी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांना महापालिकेतील या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात बसण्याचे फर्मान सोडले असून याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली आहे. प्रत्येक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दिवस आखून दिला असून त्याप्रमाणे त्यांनी त्यादिवशी मुख्यालयातील या पक्ष कार्यालयात बसणे बंधनकारक आहे. शिवसेनेचे अस्तित्व निवडणूक नसली तरी महापालिकेत दिसून यायला हवे यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेतून आमदार,खासदार आणि माजी नगरसेवक फुटून त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन केला. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची महापालिकेतील कामे होत नसून एकप्रकारे माजी नगरसेवकांमध्ये नैराश्य पसरलेले आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांची कामे महापालिकेकडून करून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता माजी नगरसेवकांना मुख्यालयात बसण्याची सक्ती केली जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून या कार्यालयाचा ताबा घेतला जाण्याची भीती असल्यानेच आदित्य ठाकरेंनी आपल्या माजी नगरसेवकांना कार्यालयात सतत बसण्याच्या सूचना केल्याचेही बोलले जात आहे.

महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्चाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नियोजनाच्या बैठका या पक्ष कार्यालयांमध्ये पार पडल्या होत्या. प्रारंभी शिवसेनेचे आमदार आणि त्यानंतर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी या पक्ष कार्यालयात बैठका घेऊन या वास्तूचा योग्यप्रकारे उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.