‘महाराष्ट्र केसरी’चा थरार पुढच्या वर्षी रंगणार

140

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून, कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे चेअरमन संजय कुमार सिंह, काकासाहेब पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे, नवनाथ घुले, मेघराज कटके, दत्ता गायकवाड, संजय शेटे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात या कुस्त्या होतील.

नामांकित ४० मल्लही सहभागी होणार

रामदास तडस म्हणाले, “अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’चे हे ६५वे वर्ष आहे. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. वर्षभर त्यासाठी मल्ल तयारी करत स्पर्धेची वाट पाहत असतात. यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असून, सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. ४७ तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.”

(हेही वाचा फाळणीला विरोध करणाऱ्या नेहरुंचे २ दिवसांत मतपरिवर्तन कसे झाले? राहुल गांधींनी खुलासा करावा रणजित सावरकरांचे आव्हान)

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरु झाली

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “स्पर्धेचे उद्घाटन १० जानेवारीला होणार आहे. उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आदी उपस्थित राहणार आहेत. कै. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे आली, ही आनंदाची बाब आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात आले आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

आखाडा, मैदानाचे उद्घाटन

६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’साठी कोथरूडमधील कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी सज्ज झाली आहे. ३० एकर जागेवर कुस्तीचा हा कुंभमेळा भरणार आहे. या मैदानाचे उद्घाटन मंगळवारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते कुदळ मारून झाले. भव्य दिव्य स्वरुपात ही कुस्ती स्पर्धा होणार असून, माती व गादी विभागाचे आखाडे, ७० हजार लोक बसतील एवढी आसनव्यवस्था येथे करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.