संपूर्ण ठाकरे कुटुंब उतरलं रस्त्यावर! फडणवीसांना हटवायला नव्हे तर…

215

महाविकास आघाडीने इवलुसा मोर्चा काढला आणि त्यास भव्य मोर्चा असे म्हटले गेले. फडणवीसांनी या मोर्च्याला नॅनो मोर्चा म्हटले. या मोर्च्यात आघाडीचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते. परंतु मोर्च्याचं आकर्षण ठरलं ते ठाकरे कुटुंब. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. काही महिन्यांपूर्वी राजकारणात पाटणकर काढ्याची चर्चा होत होती. पाटणकर म्हणजे रश्मी ठाकरे यांचं माहेर.

( हेही वाचा : बेस्टच्या वीज ग्राहकांकडून अतिरिक्त अनामत रक्कम : या पक्षाने दिला आंदोलनाचा इशारा)

शिंदेंनी जो उठाव केला, त्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे पाटणकर कुटुंबाचा शिवसेनेच्या राजकारणातील अतिरिक्त हस्तक्षेप. या हस्तक्षेपामुळे कर्तृत्ववान नेत्यांची मने दुखावली गेली. आता शिवसेनेचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत. आजारी असणारे आणि डास चावला तरी खाजवता न येणार्‍या (म्हणजे अति-गंभीर किस्सा स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितला होता) उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा घडून आली आहे, ही सुखाची गोष्ट.

आता सबंध ठाकरे कुटुंब रस्त्यावर म्हणजेच मोर्च्यात सामील झालं होतं, ही तशी साधारण घटना नाही. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महिला मुख्यमंत्री करायचा आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या दृष्टीकोनातून सामान्य शिवसैनिक म्हणजे ते स्वतः असतात, तर अर्थातच महिला मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे असणार यात वाद नाही, जरी राजकारणात आणि शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचं योगदान शून्य असलं तरी आता त्यांचा मुख्यमंत्री म्हणून विचार होऊ शकतो.

ठाकरे कुटुंबाचा मोर्च्यातील एक एकत्रित फोटो व्हायरल झाला. त्यावरुन मला एक वेगळा मुद्दा सुचला. ठाकरेंना सोडचिठ्ठी देताना सर्वांनी एक समान मुद्दा उपस्थित केला होता की ठाकरे कुणालाही वेळ देत नाहीत. पाटणकरांचा हस्तक्षेप आणि सर्वात लहान असणारे आदित्य ठाकरे देखील ज्येष्ठ नेते म्हणून फिरतात. आता अचानक ही मंडळी सक्रिय झाली आहेत आणि लोकांना भेटायला लागली आहेत. सर्व सामान्य लोकांची विचारपुस करु लागली आहेत. रश्मी ठाकरे यांनी मोर्च्यात जमलेल्या कार्यकर्त्यांची विचारपुस केल्याची बातमी देखील झळकली होती. यातून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यामुळे सर्वांना अचानक जाग आली. याच सुरुवातीस केल्या असत्या तर कदाचित शिंदेंनी शिवसेना घेतली नसती.

आता ठाकरे सक्रिय झाले आहेत ते फडणवीस किंवा भाजपच्या विरोधात नव्हे तर शिंदेच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले आहेत. कारण भाजपने आपल्याला मुख्यमंत्री नाही केलं पण शिंदेंना मुख्यमंत्री केलं. त्यांच्या दृष्टीकोनातून शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते त्यांचे सहकारी नसून कामगार आहेत. आणि मालकाला डावलून कामगाराला मुख्यमंत्री केलं अशाप्रकारचा राग त्यांच्या मनात आहे. म्हणून लवकरात लवकर हे सरकार पाडायचे आहे म्हणजे शिंदेंचे राजकीय जीवन उध्वस्त करायचे आहे असा विचार त्यांच्या मनात असू शकतो. परंतु ग्रामपंचायतीचे निकाल पाहता शिंदेंचे राजकीय करिअर उज्वल आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.