मुंबईतील मलजलावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्राची कामे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेली आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची कामे सुरु असतानाच वरळी आणि ग्रँटरोड भागातील कोस्टल रोड शेजारील झोपडपट्टयांमधील शौचालयांसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. पाच झोपडपट्टीमधील शौचालयांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या सोसायटी फॉर मुंबई इक्युबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल ) या बिझनेस इनक्युबेश सेंटरच्या इमर्जी एनव्हायरा प्रायव्हेट लिमिटेड या इनक्युबेटीजचा कोस्टल लगत असलेल्या महापालिकेच्या डी विभागामधील झोपडपट्टीतील शौचालयांकरता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रायोगिक तत्वावर खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या इमर्जी एनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेड यांनी कोस्टल रोड लगतच्या डि विभागातील शिवाजी नगर, दरिया सागर, दरिया नगर व रिवा इमारती जवळ, बडोदा पॅलेस आणि जी दक्षिण विभागातील मद्रासवाडी आदी झोपडपट्टीतील शौचालयांसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी पुन्हा उपयोगात आणले जाईल किंवा त्या पाण्याचा सामान्यरित्या निचरा करता येईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पाच प्रकल्पांसाठी सुमारे २ कोटी ९९ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे कोस्टल रोड शेजारी असलेल्या या झोपडपट्टी वस्त्यांमधील शौचालयांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरले जाणार आहे.
या झोपडपट्टयांमधील शौचालयांकरता सांडपाणी प्रक्रिया केंद्र
- डि विभाग : शिवाजी नगर : प्रकल्प क्षमता ५० केएलडी
- डि विभाग : दरिया सागर : प्रकल्प क्षमता ३५ केएलडी
- डि विभाग : दरिया सागर व रिवा इमारती जवळ : प्रकल्प क्षमता १०० केएलडी
- डी विभाग : बरोडा पॅलेस : प्रकल्प क्षमता ३०० केएलडी
- जी दक्षिण विभाग : मद्रास वाडी: प्रकल्प क्षमता ५०० केएलडी