ऐरोली येथील ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात अखेरीस सोमवारपासून पक्षीप्रेमींसाठी बोट सफारी सुरु झाली आहे. दरवर्षाला १ नोव्हेंबरला बोट सफारी सुरु होत असताना, आवश्यक परवान्यांच्या विलंबामुळे यंदाच्या वर्षी दीड महिन्यानंतर बोट सफारी सुरु झाल्यानंतर फ्लेमिंगोप्रेमींचा ठाणे खाडीतील बोट सफारीत मात्र फ्लेमिंगो दर्शनानंतर हिरमोड झाला. यंदा मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यातील ठाणे खाडी भागांत दिसून येत नसल्याचे निरीक्षण पक्षीप्रेमींनी नोंदवले. मुंबई परिसरात अद्यापही गारठवणारी थंडी सुरु झालेली नाही. त्यामुळे पक्ष्यांचे आगमन ठाणे खाडी परिसरात लांबल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगण्यात आले. वातावरणीय बदल तसेच तापमानवाढीमुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आगमनाला दिरंगाई होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
मुंबईत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरिस फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. सुरुवातीला फ्लेमिंगो पक्षी कमी संख्येने येतात. हिवाळा स्थिरावल्यानंतर ठाणे खाडीत लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याचे दिसून येते. ठाणे खाडीतील दलदलीच्या भागांत उगवणारे अल्गे हे शेवाळ फ्लेमिंगो पक्ष्याचे प्रमुख अन्न असते. अल्गे शेवाळ खाल्ल्यानंतर फ्लेमिंगोच्या शरीरावरील करडा रंग काहीसा गुलाबी रंगात परिवर्तित होतो. गुलाबी रंगामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभयारण्यात झुंबड उडते. मात्र यंदा डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरीही फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या कमी दिसून येत आहे. आता गारठवणारी थंडी लांबणीवर गेली आहे. डिसेंबर महिना उजाडला तरीही गारठवणारी थंडी नाही. त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने दिसून येत नसल्याची माहिती महाराष्ट्र लघु उद्योग पारंपरिक मच्छिमार संघटनेचे नंदकुमार पवार देतात. लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी खाडी परिसरात दिसायला प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती पवार यांनी दिली.
( हेही वाचा: १ जानेवारी २०२३ पासून होणार महत्त्वाचे बदल! सामन्यांच्या खिशावर होणार परिणाम? )
पक्षीतज्ज्ञ अक्षय शिंदे यांनीही तापमानवाढीच्या मुद्द्याला जोर दिला. तापमानवाढीमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. भरती आणि ओहोटीमधील पाण्याची उंची दरवर्षाला वाढत आहे. पाण्याच्या उंच लाटेने दलदलीतील अल्गे हे शेवाळ उगवणा-या जागांवर पाणी साचत आहे. दलदलीचा भाग सतत पाण्याखाली राहिला तर अल्गे उगवत नाही, परिणामी फ्लेमिंगो आले तरीही त्या ठिकाणी जास्त काळ थांबत नाही. यंदा पुण्यातील बिगवण येथेही फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने दिसत नसल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community