अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्या दरम्यान रंगलेला फिफा वर्ल्ड कप सामन्याचा थरार संपूर्ण जगाने अनुभवला. विजयी अर्जेंटिनाच्या संघाने उंचावलेली फिफाची सोन्याची ट्राॅफीही सर्वांनी पाहिली असेल. विशेष कौतुकाची बाब म्हणजे ही ट्राॅफी मुंबईतील एका प्रख्यात ज्वेलर्स आणि डायमंड उद्योगाच्या उपकंपनीने साकारली आहे. ही कंपनी थ्री डी प्रींटिंगच्या क्षेत्रात विशेष नावाजलेली आहे. हा लौकिक पाहूनच कंपनीला हे काम सोपवण्यात आले होते.
ही ट्राॅफी पितळेपासून तयार केलेली असून त्यावर 24 कॅरेट सोन्याचे प्लेटिंग करण्यात आलेले आहे. विजेत्या संघाना दिली जाणारी ट्राॅफी ही मूळ ट्राॅफीची प्रतिकृती असते. मूळ ट्राॅफी विजेत्या संघाला दिली जात नाही. मूळ ट्राॅफी 6.5 किलो सोन्यापासून बनवलेली आहे.
( हेही वाचा: ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार पुढच्या वर्षी रंगणार )
36 वर्षांनी अर्जेंटिनाने विश्वचषकावर कोरले नाव
अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अखेर साकार झाले. कतारच्या लुसेल स्टेडिअमवरच्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आणि फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही तिसरी वेळ ठरली. याआधी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी मेस्सीच्या अर्जेंटिनाने विश्वचषकावर पुन्हा आपले नाव कोरले.
Join Our WhatsApp Community