छत्रपती संभाजीराजे लवकरच स्वत:च्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात संघटन उभारण्याची सुरूवात संभाजीराजेंनी काही महिन्यांपूर्वी केली. या संघटनेचे अनेक उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी झाले. लवकरच संभाजीराजेंच्या हस्ते या विजयी उमेदवारांचा गौरव सोहळा होणार आहे. याच सोहळ्यादरम्यान, संभाजीराजे मोठी घोषणा करणार असल्याचेही म्हटले जाते आहे.
गेल्या दोन दशकांपासून छत्रपती संभाजीराजे यांचा कोल्हापूरच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पुण्यात पुढच्या आठवड्यात स्वराज्य संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेचे १३ सरपंच आणि ८९ सदस्य निवडून आले. या निवडून आलेल्या सदस्यांचा गौरव होणार असून त्याच कार्यक्रमात संभाजीराजे नव्या सदस्यांचा सत्कार करणार आणि नवी भूमिका करणार जाहीर करणार आहेत. त्यामुळे संभाजीराजेंच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
(हेही वाचा – पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार, फडणवीसांची घोषणा)
भाजपने २०१६ मध्ये संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त खासदारकी दिली. त्यानंतर मे २०२२ मध्ये पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. ठाकरे गटाने पाठिंबा दिला नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली. त्यामुळे संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. सर्व पक्षांपेक्षा वेगळे अस्तित्व ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मराठा समाजाचा भक्कम पाठिंबा असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी भाजपा पुरस्कृत राज्यसभा सदस्य असतानाही आपण भाजपाचे नसल्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यात राज्यसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीने संभाजीराजेंना दूर ठेवल्याचे चित्र दिसले. शिवसेनेने तर पक्ष प्रवेशाचीच अट घातली होती. त्याचवेळी आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे छत्रपती संभाजीराजे वेगळा पक्ष स्थापन करण्याची अपेक्षा होती. मात्र केवळ स्वराज्य संघटना स्थापन करून महाराष्ट्रभर संघटन उभे करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली होती. या संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असं त्यावेळीच संभाजीराजेंनी स्पष्ट केल्याने त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
Join Our WhatsApp Community