महिला आघाडीच्या नेत्यांपासून रश्मी ठाकरे चार हात दूर

259

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व आमदार उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आता आपल्या आसपास असलेल्या महिला आघाडीच्या प्रस्थापित नेत्यांचे कोंडाळे कमी केले आहे. आपली पोहोच किचनपर्यंत असल्याचा दावा काही महिला उपनेत्यांनी करत रश्मी ठाकरे यांच्या जवळ असल्याचा दावा केला असला तरी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या उपनेत्या आशा मामुडी यांच्या आरोपानंतर मिसेस ठाकरे यांनी महिला नेत्यांपासून अंतर राखत राहण्याचा निर्धार केल्याची माहिती मिळत असून मागील हल्लाबोल मोर्चात याचा प्रत्यय दिसून आला आहे.

( हेही वाचा : कोरोनाबाबत केंद्राचा अलर्ट; देवेंद्र फडणवीस म्हणाले…)

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सपा व इतर पक्षांच्यावतीने मागील शनिवारी राज्य सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चा भायखळा रिचडसन क्रुडास ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये खुद्द रश्मी ठाकरे सहभागी झाल्या होत्या. आजवर कधीही मोर्चात सहभागी न झालेल्या रश्मी ठाकरे यांच्या या उपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, एरव्ही शिवसेनेच्या मेळाव्यांसह कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना शिवसेना महिला आघाडीच्या नेत्यांच्या कोंडाळ्यात रश्मी ठाकरे असायच्या. परंतु या हल्लाबोल मोर्चामध्ये रश्मी ठाकरे यांच्या आसपासही शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या दिसल्या नाहीत. त्यामुळे आशा मामुडी यांच्या आरोपांनंतर रश्मी ठाकरे यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्यांपासून दूरच राहण्याचा निर्धार केला असल्याचे बोलले जात आहे.

रश्मी ठाकरे या हल्लाबोल मोर्चात सहभागी झाल्या तेव्हा काही काळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह चालल्या, तर अधून मधून कार्यकर्त्यांची विचारपूस करत त्या चालताना दिसत होत्या. पण यावेळी त्यांच्यासोबत किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, मनिषा कायंदे, मिना कांबळी यांच्यासह महिला नेत्या दिसल्या नाही. या सर्व नेत्या स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांसह चालताना दिसल्या. त्यामुळे त्यांच्यासमवेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळसर निळ्या साडीतील महिला सोबत दिसत होती. त्यामुळे एरव्ही रश्मी ठाकरेंची पाठ न सोडणाऱ्या या महिला नेत्या आता त्यांच्यापासून दूर चालताना दिसत असल्याने त्यांना मिसेस ठाकरे यांनी बाजूला केले की त्यांनी त्यांच्यापासून दूर राहण्याच्या आधीपासून सूचना केल्या, अशाप्रकारची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्यातील स्पर्धेमुळे महिला सोडून जात आहे,अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या महिला नेत्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाण्याची भीती आजही उध्दव व रश्मी ठाकरे यांना वाटू लागली आहे. त्यामुळे महिला नेत्यांची नवीन टिम तयार करण्याची रणनिती मिसेस ठाकरे यांनी आखली असावी असे बोलले जात आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून साधूसंत व हिंदु देवतांवर टिका केली जात असल्याने शिवसेनेला एक पाऊल मागे घ्यावे लागले. याप्रकरणात शिवसेनेला आपली भूमिकाही मांडता आलेली नाही. तसेच शिवसेनेच्या फायर बँड नेत्या म्हणून माध्यम ज्यांचा उल्लेख करत आहेत, त्या माजी महापौर व उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या घरांचे प्रकरण किरीट सोमय्यांनी बाहेर काढले. त्याच सोमय्या यांच्याशी एक लग्न सोहळ्यात पेडणेकर गोड संवाद साधताना दिसल्या, शिवाय निल सोमय्या यांना आशिर्वादही देताना दिसल्या. त्यामुळे शिवसेनेच्या महिला नेत्यांवर आता रश्मी ठाकरे यांचा विश्वास नसल्यानेच त्यांनी त्यांना बाजूला केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या आशा मामुडी यांनी उपनेत्या मिना कांबळी आणि विशाखा राऊत यांच्यावर आरोप करत रश्मी ठाकरेंच्या जवळ असल्याचा त्या किती गैरफायदा घेतात हे जाहीर केले. त्यामुळे या महिला नेत्यांना रश्मी ठाकरे यांनी आतापासून बाजूला ठेवल्याचे बोलले जात आहे. शिवाय या सर्व महिला केव्हाही पक्ष सोडून जाण्याची भीती असल्याने रश्मी ठाकरे यांनी नवीन दमाच्या महिलांना घेऊन त्यांना सोबत ठेवण्याचा निर्धार तर केला नाही ना अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.