डोंगरीतील सराईत बॅग लिफ्टर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

137
डोंगरी येथून एका सराईत ‘बॅग लिफ्टर’ला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाला अटक केली आहे. फजल नजीर असफाक असे अटक करण्यात आलेल्या बॅग लिफ्टरचे नाव आहे. फजल याने काही दिवसांपूर्वी विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावरून रिक्षातून निघालेल्या दाम्पत्याची बॅग खेचून पळ काढला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दाम्पत्या जवळील बॅग खेचून पळ काढला

फजल नजीर असफाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दक्षिण आणि मध्य मुंबईतील विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. भांडुप पूर्व येथे राहणारे एक दाम्पत्य राजस्थान येथून १२ डिसेंबर रोजी पहाटे मुंबईत परतले होते, वांद्रे रेल्वे टर्मिनस येथून त्यांनी भांडुप येथे घरी येण्यासाठी रिक्षा केली होती, पूर्व द्रुतगती महामार्गावरून जात असताना घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान स्कूटर वरून सुसाट वेगाने आलेल्या फजल याने रिक्षातून निघालेल्या दाम्पत्या जवळील बॅग खेचून पळ काढला.

विक्रोळी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल

अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळलेल्या दाम्पत्य तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यात पोहचले व त्यांनी तक्रार दाखल केली होती. चोरी गेलेल्या या  बॅगेत अप्पल कंपनीचे स्मार्ट वॉच, मोबाईल, क्रेडिट कार्ड असा एकूण ९८ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा संलग्न तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभाग कक्ष ७ च्या पथकाने सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपास तसेच खबऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन डोंगरी येथून फजल याला अटक करून त्याच्याजवळून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कक्ष ७ चे प्रपोनि. महेश तावडे, पोनि. नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.  शेलार, परबळकर, पोलीस हवालदार बल्लाळ, जाधव, शिरापुरी,व्हॅनमाने, सय्यद, गलांडे, या पथकाने हा तपास केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.