भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं निधन

123

पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ५७ वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव उद्या, शुक्रवारी सकाळी ९.०० ते ११.०० यावेळेत केसरी वाडा राहत्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यांचा अंत्यविधी वैकुंठ स्मशामभूमी येथे ११ वाजेनंतर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – नागपूर भूखंड घोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवेंनी दिले पुरावे; काय खरे काय खोटे?)

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअऱ अॅम्ब्युलन्सने नेण्यात आले होते. मुक्त टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात शहराचे महापौरपद भूषविले होते. त्या भाजपच्या पहिल्या महापौर असल्याचीही माहिती आहे. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत.

राजकीय कारकीर्द

आमदार होण्यापूर्वी मुक्ता टिळक पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक १५ च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर २०१७ साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. महापौर असतानाच २०१९ साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. तर मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. मुक्ता टिळक या गोपीनाथ मुंडे आणि गिरीश बापट यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जायच्या.

शिक्षण

पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या मुक्ता टिळक यांनी पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. शिवाय, मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.