३५ वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात गुरुवारी सकाळी समोर आली आहे.” माझ्या पत्नीला त्रास सुरु होता, परंतु डॉक्टरांनी तिच्याकडे लक्ष न दिल्यामुळे पत्नीचा मृत्यु झाला, असा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह राजवाडी रुग्णालय या ठिकाणी पूर्वतपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
( हेही वाचा : २०२३ मध्ये IPL केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले संकेत )
किरण पाठक (३५) असे या मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. ती पती विजय पाठक आणि दोन मुलांसह कुर्ला पश्चिम न्यु.मिल रोड येथे राहण्यास होती. ८ महिन्यांची गर्भवती असलेल्या किरणला गुरुवारी पहाटे भयंकर त्रास जाणवू लागल्यामुळे पतीने तिला ६वाजता कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आणले होते, बराच वेळ तिच्यावर उपचार न झाल्यामुळे ती जमिनीवर कोसळून तिचा आणि तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाचा मृत्यू झाला.
“माझ्या पत्नीला त्रास होत असल्यामुळे तिला भाभा रुग्णालयात घेऊन आलो होतो, डॉक्टरांनी तिला लेबर वॉर्ड मध्ये भरती केले, परंतु बराच वेळ तिच्याकडे एकही डॉक्टर न फिरकल्यामुळे माझी पत्नी दोन वेळा वॉर्डच्या बाहेर आली व डॉक्टर लक्ष देत नसल्याचे सांगितले, मी डॉक्टरांना विनंती केली परंतु कोणीही माझ्या पत्नीकडे लक्ष देत नव्हते, तिला जास्त त्रास होत असल्यामुळे ती पुन्हा बाहेर आली व जमिनीवर कोसळली, त्यावेळी महिला सुरक्षा रक्षकाने “तुम्हारी बीबी नाटक कर रही है,असे बोलून दुर्लक्ष केले, त्यानंतर तासाभराने डॉक्टरांनी माझी पत्नी व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे कळविले, असे मृत किरण पाठक हिचा पती विजय पाठक यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना सांगितले.
याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह पूर्व तपासनीसाठी राजवाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे असे कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे यांनी म्हटले असून वैद्यकीय अहवाल जे.जे रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे. जे. जे रुग्णालयाच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असेही होवाळे यांनी हिंदुस्थान पोस्टला सांगितले.
Join Our WhatsApp Community