ड्रग्सच्या धंद्यापाठोपाठ अंडरवर्ल्डने गुटख्याच्या धंद्यात देखील आपले हातपाय पसरवले आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्यामुळे चढ्या भावात विकणाऱ्या गुटख्याला महाराष्ट्रातील वाढती मागणी बघता गुजरात पाठोपाठ हरियाणा राज्यातून गुटख्याची तस्करी केली जात आहे. या तस्करीमध्ये अंडरवर्ल्डमधील अनेक टोळ्यांनी आपले बस्तान बसविल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणारा गुटख्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या जिल्ह्यात एका महिन्यात शेकडो कोटींचा गुटखा विकला जात असल्याची माहिती गुटखा व्यापारीवर्गातील सूत्रांनी दिली आहे.
बंदी मुळे गुटख्याला राज्यात अधिक मागणी
माणिकचंद, गोवा, विमल, राजश्री या सारख्या गुटख्याला महाराष्ट्रात एकेकाळी खूप मोठी मागणी होती. ज्यावेळी महाराष्ट्रात गुटखा अधिकृतपणे विकला जात होता, त्यावेळी गुटख्याच्या अनेक कंपन्या उदयास आलेल्या होत्या. परंतु महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात आल्यानंतर लहान मोठ्या गुटखा कंपन्या बंद झाल्या मात्र पैशांच्या जोरावर बड्या कंपन्यानी महाराष्ट्राच्या बाहेर आपला व्यवसाय सुरू करून चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक महाराष्ट्रात सुरू केली. सरकारी यंत्रणेला मॅनेज करून हा गुटखा राज्यात आणला जातो, तोच गुटखा किमतीपेक्षा चढ्या भावाने विकला जात आहे. आज महाराष्ट्रात नावाला गुटखा बंदी असली तरी सर्रासपणे बंदी असलेला गुटखा दुकानांमध्ये विकला जात आहे.
अंडरवर्ल्ड डॉन गुटख्याच्या धंद्यात
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहिम याने गुटख्याच्या धंद्यातील नफा बघून गुटखा किंग असणाऱ्या व्यवसायिकाकडून खंडणी वसुली करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर दाऊद टोळी स्वतः या गुटख्याच्या धंद्यात उतरली होती. सरकारी यंत्रणेला पैसे पुरवून गुटख्याचा माल बंदी असलेल्या राज्यात पोहचविण्याचे काम आपल्या टोळीकडून करून घेत होती.
(हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे प्रमाण घटणार!)
माफिया डॉन दाऊद इब्राहिम जेव्हा भारतातील दोन गुटखा किंग मधील वैर मिटवायला बसला तेव्हा त्याने ७० कोटींची लढाई ७ कोटी घेऊन मिटवली होती. हा वाद मिटवल्यानंतर दाऊदने या व्यावसायिकांसमोर अशी अट ठेवली, जी ते नाकारू शकत नाहीत. केवळ भारतीयच नाही तर पाकिस्तानी लोकही गुटख्यासाठी तळमळतात. सवयीच्या या हौशी आजाराने मुंबई जितकी हैराण झाली आहे, तितक्याच भयंकर आजाराने कराचीतील लोक त्रस्त झाले आहेत.
पाकिस्तानात असा वाढला गुटखा
पाकिस्तानमध्ये गुटखा उद्योग कसा वाढला? त्याचा अंडरवर्ल्डशी काय संबंध? भारतातील दोन गुटखा किंगमधील भांडण दाऊदच्या दरबारात कसे पोहोचले? मुंबईपासून सुरू होणारी ही कथा दुबईपर्यंत पोहोचते आणि नंतर कराचीमध्ये संपते. या कॉर्पोरेट युद्धात जो ‘न्याय’ झाला, त्यानंतर कराचीत आधुनिक गुटखा निर्मिती कारखान्याचा पाया रचला गेला. भारत आणि पाकिस्तानचे व्यापारी संबंध विशेष नव्हते. असे असतानाही या गुटखा कारखान्याचे सर्व तंत्रज्ञान व यंत्रसामग्री मुंबईहून दुबईमार्गे कराचीत पोहोचली होती. गुटख्याच्या तस्करीचे तार आता दुबई आणि पाकिस्तानशी जोडले गेले आहेत. शेकडो कोटींच्या करचोरी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने गुटखा व्यावसायिक किशोर वाधवानी याला मुख्य सूत्रधार ठरवले आहे. गुटखा तस्करीच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची करचोरी तर होतेच, पण त्यातून कमावलेला पैसा दुबई आणि पाकिस्तानलाही पाठवला जात होता, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
राज्यात हजारो कोटींची उलाढाल
महाराष्ट्रात महिन्याला हजारो कोटींची उलाढाल करणारा गुटखा गुजरात पाठोपाठ हरियाणा राज्यातून तस्करी केला जात आहे. विमल, राजश्री, तसेच आणखी काही गुटखा कंपन्यांच्या गुटख्याची महाराष्ट्रात तस्करी केली जात आहे. पान मसाल्याच्या नावाखाली ही तस्करी सुरू आहे, महाराष्ट्र गुजरात सीमेवरून या गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात आहे, पकडल्या गेल्यानंतर सरकारी यंत्रणेला मॅनेज करून गुटखा राज्यात आणला जात आहे. गुटखा तस्करीमध्ये अंडरवर्ल्ड टोळ्या, तसेच ड्रग्स तस्करांनी गुटख्याची तस्करी सुरू केली असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांच्या सांगण्यात येत आहे.
अमली पदार्थासह पकडल्या गेल्यावर तुरुंगातून लवकर सुटका होत नाही, व अमली पदार्थ विरोधी कायद्यात हा गंभीर गुन्हा असल्यामुळे शिक्षा होण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र गुटख्याच्या तस्करीत अधिक रिस्क नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला तरी जामिनावर बाहेर पडता येते व शिक्षेचे प्रमाण देखील कमी असल्यामुळे अनेक ड्रग्स तस्कर या गुटख्याच्या धंद्यात उतरले आहे.
Join Our WhatsApp Community