जागतिक दर्जा मिळवलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील रामसर क्षेत्रात घारींची वाढती संख्या आता पक्षीप्रेमी तसेच मच्छिमारांसाठी चिंताजनक ठरु लागली आहे. डम्पिंग ग्राऊण्डमधील कचरा तसेच कत्तलखान्यातील प्राण्यांचे अवशेष हे आयते खाद्य खाण्यासाठी घारींचा ठाणे खाडी परिसरात वाढवलेला मुक्काम ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला.
( हेही वाचा : शिर्डीत साई भक्तांसाठी पुन्हा मास्कसक्ती! मंदिर प्रशासनाने जारी केले नवे नियम… )
विक्रोळी खाडी, भांडूप पम्पिंग स्टेशन या केंद्रानजीकच्या पाणथळ जागेत सकाळच्या वेळेत घारींचे मोठ्या संख्येने दर्शन होते. या भागात अंदाजे हजारोंच्या संख्येने घारी आढळून येतात, अशी माहिती महाराष्ट्र लघुउद्योग पारंपरिक मत्स्यव्यवसाय कामगार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली. नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ तसेच कांजूरमार्ग, देवनार, कोपरी या डम्पिंग ग्राउंडमुळे ठाणे खाडीतील जलप्रदूषणात वाढ झालेली आहे. हौसी पर्यटक देखील वारंवार तीव्र दुर्गंधी बाबत तक्रारी करतात, असेही ते म्हणाले. ठाणे खाडी रामसर क्षेत्र जाहीर झाले ही निश्चितच आनंददायी बाब आहे. या भागांतील जैवविविधता जपण्यासाठी डम्पिंग ग्राऊण्डमधील कचरा खाडीपात्रात तसेच दलदलीच्या क्षेत्रात येणार नाही यासाठी तातडीने कामयस्वरुपी उपाययोजना करायला हव्यात. घार ही शिकारी पक्षी म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत इतर कोणत्याही पक्ष्यांच्या अंडी किंवा पिल्लांना घारींमुळे त्रास झाल्याचे दिसून आलेले नाही परंतु ही शक्यताही नाकारता येत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ठाणे खाडीत घार, कावळे तसेच अभावाने गिधाडांचेही दर्शन होते. ठाणे खाडीत देवनार तसेच राबोडी कत्तलखान्यातून येणा-या प्राण्यांच्या अवशेषाचे आयते खाद्य खाडीपात्रात येते. हे खाद्य मिळवण्यासाठी घारींची संख्या वाढत आहे. हिवाळ्यात ठाणे खाडीत स्थलांतरित हिवाळी घारीही येतात. परिणामी, या ऋतुमानात घारींची संख्या जास्त दिसून येते, अशी माहिती पक्षीतज्ज्ञ अविनाश भगत यांनी दिली. डम्पिंग ग्राऊण्डमध्ये ओला व सुका कच-याचे विघटन होत नसल्याने हा कचरा ठाणे खाडीत येत आहे. कच-यातून मिळणारे अन्नपदार्थ खाण्यासाठी घारी तसेच कावळ्यांची संख्या डम्पिंग ग्राउण्डच्या नजीकच्या दलदलीच्या भागांत दिसून येत असल्याचे भगत म्हणाले.
ठाणे खाडीत भरतीच्या वेळी घारी झाडांवर आराम करतात. त्यावेळी घारींची नेमकी संख्या पहायला मिळते. गेल्या दहा वर्षांपासून ठाणे खाडी परिसरांत घारींची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. घारींच्या वाढत्या संख्येबाबत शास्त्रोक्त अभ्यासाची गरज पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी व्यक्त केली. घारींच्या संख्येने ठाणे खाडीतील पक्ष्यांचा अधिवास खराब होतोय, त्यामुळे तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला हवे, असेही शिवकर म्हणाले.
घारींची संख्या समजण्यासाठी
घारींची नेमकी संख्या हे समजण्यासाठी पक्षीप्रेमी ई बर्ड या जागतिक दर्जाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले योगदान देऊ शकतात. ऑनलाईन एप्लिकेशन तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरात कोणत्याही ठिकाणी आढळून येणा-या पक्ष्यांच्या नोंदी देता येतात. हा नागरिक विज्ञान कार्यक्रम असल्याने ठाणे खाडीतील घारींची संख्या मोजण्यासाठी या परिसराला भेट देणा-यांनी ही ऑनलाईन माहिती भरल्यास घारींची संख्या समजण्यास मदत होईल, असेही शिवकर म्हणाले. दहा वर्षांच्या अभ्यासानंतर घारींच्या वाढत्या वावराबाबत उलगडा होईल, अशी माहिती शिवकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community