चीनमध्ये कोरोनाच्या बीएफ.७ या विषाणूचा उद्रेक झाल्याची घटना ताजी असतानाच गुजरात राज्यातही या विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याने देशभरात खळबळ उडाली. शेजारच्या राज्यात कोरोनाचे रुग्ण दाखल झालेले असतानाही अद्याप इतर राज्यातून तसेच विमानमार्गातून आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवास करणाऱ्या रुग्णांची राज्यात तपासणी करण्याबाबत निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या संशयित रुग्णांना वेळेवर तपासणी आणि उपचारांस सुरुवात करा, याबाबतीत हलगर्जीपणा नको अशा सूचना जिल्हापातळीवर सर्व पालिका अधिका-यांना राज्य आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
आरोग्य विभागाने याबाबत स्पष्टता येण्यासाठी केंद्राकडून अद्याप माहिती मिळणे बाकी असल्याचे सांगितले. तर मुंबई विमानतळावरील तपासणीबाबत राज्य आरोग्य विभाग माहिती दिल्यानंतर कार्यवाही सुरु केली जाईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली. चीनमध्ये उद्रेक झालेल्या बीएफ.७ या विषाणूबाबत घाबरण्याचे कारण नाही, याआधीही देशात हा विषाणू आढळला आहे. आपल्याकडे कोविड प्रतिबंधात्मक लशीचा पुरेसा साठा असल्याचा दावा आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी केला. मात्र प्रत्येक जिल्ह्यात कोविड सेंटरबाबतची पूर्वतयारी याबाबत निर्णय झालेला नसल्याची कबुली राज्य आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या प्रवाशांबाबत केंद्र सरकारकडून तपासणीबाबतच्या आदेशांबाबत स्पष्टता आलेली नाही. राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. आम्ही इतर तयारीबाबत चर्चाविनिमय करत आहोत.
डॉ संजय खांदारे, प्रधान सचिव, आरोग्य विभाग