दादरमध्ये पदपथावरील फेरीवाले आले रस्त्यावर, रहिवाशांच्या तक्रारीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

248

मुंबईतील फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वनिधी (पीएम स्वनिधी) योजनेतंर्गत १० हजार रुपयांचे कर्ज विविध बँकांकडून उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. मात्र, या पीएम स्वनिधीचा लाभ देण्यात येत असतानाच दुसरीकडे फेरीवाल्यांच्या कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. कालपर्यंत पदपथांवर पथारी पसरवणाऱ्या फेरीवाल्यांनी आता रस्तेही अडवून ठेवतानाच आपले सामान ठेवण्यासाठीची वाहनेही रस्त्यांवर लावून जागा अडवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी रस्त्यांच्या दोन्ही पदपथांच्या खालील रस्त्यांवरही फेरीवाल्यांनी धंदे थाटल्याने आता वाहनांनाही रस्ते अपुरे पडताना दिसत आहेत.

( हेही वाचा : ट्विटर अकाऊंट हॅण्डल कोण करते; अमृता फडणवीसांनी केला खुलासा)

मुंबईत मागील दोन महिन्यांपासून फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधीचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न केला जात आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून फेरीवाल्यांकडून अर्ज भरुन बँकांना शिफारस पत्र दिले जात आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याने रस्त्यांवर पथारी पसरवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवरील कारवाई थंडावली आहे. याचा फायदा घेत आता फेरीवाल्यांनीही आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे.

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि केळकर मार्गावर जिथे पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसोबतच आता पदपथाखालील रस्त्यांवरही व्यावसाय करण्यास सुरुवात केली असून यामुळे फेरीवाल्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. केळकर मार्गावर पदपथांवर फेरीवाल्यांकडून सामान बांधून ठेवले जात असून या अडवलेल्या जागांमुळे जुन्या फेरीवाल्यांसह काही नवीन फेरीवाल्यांनी रस्त्यांचा आधार घेत त्याठिकाणी व्यवसाय थाटले आहेत. ज्यामुळे या रस्त्यांवर बेस्ट बसेससह टॅक्सी व खासगी वाहनांनाही चालण्यास जागा शिल्लक राहत नाही.

विशेष म्हणजे केळकर मार्गाला छेदून जाणाऱ्या रानडे मार्गावरील सिग्नलपासून ते पुढे वामन हरि पेठे या दुकानापर्यंत दोन्ही बाजुला पदपथासह रस्त्यांवरही फेरीवाल्यांनी जागा अडवलेली आहे. याठिकाणी चांदेरकर स्वीट्सच्य समोर उसाच्या गुऱ्हाळाचा स्टॉल १५ दिवसांपूर्वी लावण्यात आला असून या स्टॉल्सला विजेची जोडणीही देण्यात आली आहे. तसेच याच रस्त्यांवर आता गुळाचा चहासह खाद्य पदार्थ विक्रीचा टेम्पोही काही दिवसांपासून लावला जात आहे. तर येथील कपडे विक्रेत्यांची मारुती ओमनी व्हॅन ही कायम याठिकाणी उभी असते. या व्हॅनमध्ये हे कपडे विक्रेते आपले सामान ठेवत असतात. त्यामुळे या ओमनी व्हॅनद्वारे रस्त्याची जागा अडवली जात असून त्या आड फेरीवाल्यांची दुकाने वाढवली जात आहेत. त्यामुळे येथील स्थानिक इमारतीतील रहिवाशांना आपली वाहनेही रस्त्यावर उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसून फेरीवाल्यांनीही पदपथासह रस्ते अडवल्याने स्थानिक इमारती तसेच दुकानदारांना आपली वाहनेही उभी करण्यास जागा नसल्याने आता दाद मागायची कुणाकडे असा सवाल रहिवाशी आणि दुकानदारांकडून केला जात आहे. हा मार्ग एक मार्गिका असून दोन्ही बाजुला वाहने आणि फेरीवाले यामुळे रस्ता अडवल्याने यावरुन वाहनांनाही वाहतुकीसाठी जागा शिल्लक नसते, परिणामी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. याठिकाणी फेरीवाल्यांनी रस्तेही अडवलेले असतानाही महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे अधिकारी हे धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरताना दिसतात. स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी या फेरीवाल्यांच्या ताटाखालील मांजर असल्यासारखे वावरत आहेत. स्थानिक रहिवाशांऐवजी फेरीवाल्यांच्या हितासाठी आपण अधिक पाईक असल्यासारखेच महापालिकेचे अधिकारी वागत असल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.