मुंबईत फुड ऑन व्हिल अर्थात फिरत्या वाहनांमधून खाद्यपदार्थ विक्रीची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात असून या फिरत्या खाद्यपदार्थ विक्रीसह आता फिरत्या वाचनालयाची सुविधा मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने फिरत्या वाचनालयाची सुविधा वाहनांद्वारे दिली जात आहे. सध्या अशाप्रकारची वाहने भायखळा ई विभागाकरता आहे. या फिरत्या वाचनालयात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सर्व पुस्तके विभागातील रहिवाशांना मोफत वाचायला दिली जाणार आहे. त्यामुळे भायखळ्यातील रहिवाशांना पुस्तके चकटफू वाचता येणार आहे.
( हेही वाचा : राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच सुधीर मुनगंटीवार यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्वासन! )
भायखळा येथील महापालिकेच्या ई विभागातील बेरोजगारांना फिरते वाचनालय करता दोन वाहनांची खरेदी करण्यात येत आहे. ही वाहने पुस्तकाविना खरेदी केली जात असून येत्या जानेवारी महिन्यात ही वाहने महापालिकेच्या सेवेत दाखल होणार आहे. या दोन वाहनांच्या खरेदीसाठी सुमारे ६६ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी रामभिया ब्रदर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दोन्ही वाहने भायखळा ई विभागाकरता असून या वाहनातून फिरते वाचनालय हे विभागात सुरु केले जाईल. या फिरत्या वाचनालयामध्ये कोणत्या प्रकारची पुस्तके ठेवली जावीत याची निवड शिक्षण विभागाच्यावतीने केली जाईल. त्यांच्या शिफारशीनुसार मराठी, इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दु भाषिक साहित्य ठेवले जाईल. यामध्ये स्पर्धा परिक्षेसह इतर सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली जातील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या वाचनालयात कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्णपणे निशुल्क असेल,असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community