मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये बालकोत्सव साजरा करण्यात येत असून, भांडुप व्हिलेज आणि कांदिवली पश्चिम येथील विविध महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा बालकोत्सव साजरा करण्यात आला. या बालकोत्सवामध्ये शाळांमधील मुलांनी विविध नृत्य आणि संगीत सादर करत आपली कला सादर केली.
भांडुप व्हिलेज महापालिका मराठी शाळा येथे मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे बालकोत्सव २०२२-२३ आयोजित करण्यात आला होता. या सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय मुलांनी हे नृत्याविष्कार सादर केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सारीका पवार यांनी विशेष उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
( हेही वाचा: कांजूरमार्गमध्ये उभे राहतेय नवीन अग्निशमन केंद्र )
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने कांदिवली आर दक्षिण विभागातील शाळांचा बालकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कांदिवली आर दक्षिण विभागातील बजाज शाळेत पार पडला. हा कार्यक्रम दोन दिवस म्हणजे २० व २१ डिसेंबर २०२२ ला आयोजित केला गेला होता. या बालकोत्सवाच्या कार्यक्रमात विभागातील आठ शाळा सहभागी झाल्या होत्या. यात शेतकरी नृत्य, टिपरी नृत्य, होजगिरी,गौर, डांगी, गेंदी, तारपा, नागा या लोकनृत्यांचा समावेश होता. तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या विविध गटातील विद्यार्थ्यांनी केशभूषा व वेषभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमात एकूण २४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विभागाच्या प्रशासकीय अधिकारी कल्पना संखे, विभाग निरीक्षक पंकज पिंपळे उपस्थित होते. हेमांगी पिसाट तसेच हर्षद कडलख यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनुजा चव्हाण यांनी केले. तसेच, रुपाली बारी आणि गौरी देशपांडे आदींचेही सहकार्य लाभले. दुसऱ्या दिवशी उपशिक्षणाधिकारी ममता राव आणि अधिक्षक मुक्तर शाह आदींनीही हजेरी लावली होती.