नवीन वर्षात तब्बल ३० हजार पदांवर शिक्षक भरती होणार, केसरकरांची घोषणा

133

शिक्षक वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मोठ्या शिक्षक भरतीची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीबाबत चर्चा सुरू असताना राज्य सरकारने शिक्षक भरतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीप्रमाणेच शिक्षक भरती देखील गेल्या काही वर्षांपासून रखडलेली होती. मात्र आता नव्या वर्षात जंबो शिक्षक भरती होणार आहे.

अर्थ खात्याने शिक्षकांच्या ८० टक्के भरतीला मंजुरी दिली आहे. त्यापैकी ५० टक्के पदे तातडीने भरली जाणार आहेत. राज्यात नवीन वर्षात ३० हजार पदे भरली जातील, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदभरती करण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय, शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड लिंकिंगचे काम सध्या सरल प्रणाली अंतर्गत सुरू आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थी संख्या निश्चितपणे कळेल. त्यानंतर एकूण आवश्यक शिक्षक संख्येची गरज लक्षात घेवून संपूर्ण पदभरती केली जाईल, अशी माहितीही मंत्री केसरकर यांनी दिली.

(हेही वाचा – आनंदाची बातमी! आता भारतात Covid-19 वर मात करणं होणार आणखी सोपं)

तसेच कोणतीही शाळा बंद होणार नसून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याचा निव्वळ अफवा असल्याचे केसरकर म्हणाले. विधानसभा सदस्य अमित देशमुख यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले की, एक किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांसाठी शाळेची व्यवस्था असावी, तेथे दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत आवश्यक सोयीसुविधा निश्चितपणे दिल्या जाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेली कोणतीही शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.