मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी आज, शुक्रवारी पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपल्या हस्ते नियुक्तीपत्रे दिली. ही नियुक्तीपत्रे देतानाच त्यांनी मनसैनिकांमध्ये प्राणही फुंकले. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात मनसेचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. यादरम्यान पराभव जरी आला तरी खचून जाऊ नका, असा कानमंत्र देखील राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना नागपूरात बोलताना दिला.
काय म्हणाले राज ठाकरे
नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज भाजपाचा आहे आणि कालांतराने हेही चित्र बदलेल. जे आपल्यावर हसत आहेत त्यांनी हसावं, हे पोट्टं काय करणार असेही तुम्हाला काही लोक बोलत असतील तर बोलू द्या. पण मी विश्वास देतो की, एकेदिवशी हेचं पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार, असेही राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा – … म्हणून २९ डिसेंबरपर्यंत चालणारे लोकसभा-राज्यसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित)
पराभव होईल पण…
मनसेला पदाधिकारी मिळत नाहीत, अशा बातम्या काहींनी दिल्या होत्या. अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालावं, म्हणून आज नियुक्ती पत्रकं सर्वांसमोर वाटत आहे. पक्ष वाढवणं काही सोपं काम नाही. त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. आज जो पक्ष बहुमतानं सत्तेत आहे. त्यालाही बहुमत मिळण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागली आहे. आज सारं इस्टंट हवं असतं. पण राजकारणात इस्टंट गोष्टी चालत नाहीत. महात्मा गांधींचं एक चागलं वाक्य आहे, जेव्हा तुम्ही शुल्लक वाटत असता तेव्हा तु्म्हाला कोणी महत्त्व देत नाही, पण जेव्हा मोठं होऊ तेव्हाच सगळे आपल्याशी लढायला येतील. फक्त तुमच्यामध्ये आग असली पाहिजे, पराभव होईल पण खचून चालणार नाही. पराभव कोणाचा नाही झाला. दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
सत्तेच्या खूर्चीचा मोह मला नाही
आज आपला पक्ष सत्तेत नसला तरी भविष्यात जेव्हा आपल्या हाती सत्ता येईल, तेव्हा तुम्हालाच आमदार, खासदार व्हायचे आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्यापैकीच मनसैनिक उद्या सत्तेच्या खूर्चीवर असतील. सत्तेच्या खूर्चीचा मोह मला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.