IPL २०२३ या आगामी हंगामासाठी सध्या कोची येथे मिनी लिलाव सुरू आहे. यामध्ये इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनवर तब्बल १८.५० कोटींची बोली लावत त्याला पंजाब किंग्सने (PBKS) विकत घेतले आहे. याआधी IPL च्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस हा सर्वात महागडा वेगवान खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्सने त्याला २०२१ मध्ये १६.२५ कोटींना खरेदी केले होते परंतु यंदा ख्रिस मॉरिसचा हा विक्रम सॅम करनने मोडीत काढला आहे.
सॅम करनवर यंदा अनेक फ्रॅंचायझींची नजर होती. त्याचा जुना संघ चेन्नई आणि पंजाब यांच्यात त्याला विकत घेण्यासाठी लढाई होती परंतु अखेर पंजाबने सॅमला १८.५० कोटींना विकत घेतले आहे. तसेच चेन्नईने भविष्यातील कर्णधार म्हणून बेन स्टोक्सला १६.२५ कोटींना विकत घेतले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबत तो एक चांगला कर्णधार सुद्धा आहे. स्टोक्स हा राजस्थान रॉयल्समध्ये अनेक वर्ष सहभागी होता. परंतु आता २०२३ साठी चेन्नई संघाकडून स्टोक्स खेळेल. तसेच मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला विकत घेत त्याचा संघात समावेश केला आहे. सॅमनंतर ग्रीन सर्वात महागडा खेळाडू ठरला त्याच्यावर १७.५० कोटींची बोली लागली.
इंग्लंडच्या खेळाडूंना मागणी
यंदाच्या हंगामात इंग्लंडच्या खेळाडूंना लिलावात विशेष मागणी असल्याचे पहायला मिळाले. सॅम करन, बेन स्टोक्स यांना मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक बोलीनंतर युवा खेळाडू हॅरी ब्रुकलाही १३.२५ कोटींना सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले आहे.
Join Our WhatsApp Community