नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या बछड्याचा अर्धवट अवस्थेत मृतदेह शुक्रवारी सकाळी वनाधिकाऱ्यांना सापडला. बछड्याच्या मृतदेहावरील जखमांवरून वन्यप्राण्यानेच किंवा जंगलातील नर वाघानेच बछड्याला खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
( हेही वाचा : IPL २०२३ मध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या पदरी निराशा!, तर ‘हे’ खेळाडू राहिले UNSOLD)
गुरुवारीच बछडा मृत पावला
पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मधील देवलापर वन परिक्षेत्रात बांद्रा खुर्सापार रस्त्यावर टी -65 या वाघिणीने गुरुवारी संध्याकाळी अंदाजे महिन्याभराचा बछडा उचलून नेताना गस्ती पथकाने पाहिले. अंदाजे महिन्याभराच्या बछड्याला शेपटीकडून वाघीण उचलून नेत असल्याने बछडा मरण पावल्याचा संशय वनाधिकाऱ्यांना आला. मात्र वाघीण सोबत असल्याने वनाधिकाऱ्यांनी लांबूनच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. सकाळी पुन्हा दहा वनाधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी पोहोचली.
ही वाघीण बांद्रा वनपरीक्षेत्रात वनाधिकाऱ्यांना आढळली. बांद्रा नियतक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ येथे वाघिणीच्याजवळ बछड्याचे मृत शरीर अर्धवट स्वरूपात खाल्लेले दिसून आले. वाघीण मोठ्या आवाजात गुरकत असल्याने वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळापासून पुन्हा माघार घेतली. वाघीण निघून गेल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. या भागात गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.