दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूचे पडसाद पुन्हा एकदा उमटू लागले आहेत. यावेळी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं ते शिवसेनेच्या नेत्यामुळे. शिंदे गटाचे खासदार राहुल शॆवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला ‘AU’ या नावाने ४४ फोन करण्यात आले. आता हा AU कोण? हा महत्वाचा प्रश्न आहे.
लोकसभेत आपला मुद्दा मांडताना राहुल शेवाळे यांनी सांगितलं की हा AU दुसरा कुणी नसून आदित्य उद्धव आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या प्रकरणातील खरी माहिती लोकांसमोर यावी यासाठी मी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवी, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
सीबीआयची एंट्री झाली नाही
यावर भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ते पुढे असं म्हणालेत की, दिशा सालियानचे अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून समोर आलेले नाहीत. अजूनही हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे आणि अजूनही सीबीआयची एंट्री ह्यात झालेली नाही. ते मुख्यमंत्र्यांना याबद्दल विनंती करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंसाठी कव्हर फायरिंग करायला इतर पक्षातले नेते देखील पुढे आले आहेत. जितेंद्र आव्हाड त्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे सुशिक्षित तरुण अनंत कुरमुसे यांना मारहाण केल्याचे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले आहे. ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं असल्याचं वक्तव्त त्यांनी केलं आहे. आता खरं पाहता सुशांत किंवा दिशाच्या प्रकरणातून काय सत्य बाहेर निघेल हे सांगणं कठीण आहे. कारण गुन्हा झाला असं कुणी गृहित धरलं तर त्याविषयी पुरावे कधीच नष्ट झाले आहेत.
(हेही वाचा आता राहुल शेवाळेंचा मनीषा कायंदेंवर पलटवार; ज्येष्ठ नेत्याला केले ब्लॅकमेल)
खरा चेहरा लवकरच बाहेर येवो
पण यामुळे आदित्य ठाकरेंचं राजकीय करिअर मात्र धोक्यात आलं आहे. शिंदे गटाला ५० खोके एकदम ओक्के! असं सारखं सारखं डिवचल्याचा राग त्यांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. ठाकरे कुटुंबाचं हेच चुकतं, कोणतं प्रकरण कधी सोडावं हे त्यांना कळत नाही. शिंदेंचा उठाव ही जुनी गोष्ट झाली, आता पुढचा विचार केला पाहिजे. पण ठाकरेंचं मन अजूनही गुवाहाटीत अडकलंय. त्यामुळेच राहुल शेवाळे यांनी पुन्हा हे प्रकरण बाहेर काढलं. जर या प्रकरणातील सत्य बाहेर आले, तर लोकांचा न्यायालयावरचा विश्वास दृढ होईल. नाहीतर सामान्य लोक हकनाक मरत असतात. त्यात एक सुशांत आणि एक दिशा! हा जो गुप्त AU आहे, त्याचा खरा चेहरा लवकरच बाहेर येवो आणि आम्हा जनतेचा न्यायालयावरचा विश्वास वृद्धिंगत होवो, त्याचबरोबर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होवो.
Join Our WhatsApp Community