गिरगावला जोडल्या जाणाऱ्या त्या पुलाचे बांधकाम लवकरच

129

गिरगाव ते चर्नी रोड पूर्व भागाला जोडणारे पादचारी पूल मागील साडेतीन वर्षांपासून तोडून ठेवण्यात आले असून या पूलाच्या बांधकामासाठी अखेर मुहूर्त सापडला. त्यामुळे चर्नी रोड स्थानक (पूर्व) ते गिरगाव डॉ.भालेराव मार्ग येथे जोडणा-या पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर या पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

( हेही वाचा : भांडूप उषानगर नाल्यावरील तिन्ही पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर)

गिरगाव (केळेवाडी) येथील पादचारी पूल मागील अनेक वर्षांपासून तोडून ठेवण्यात आले असून या पुलामुळे गिरगावमधील जनतेला महर्षी कर्वे रोड ओलांडून जाताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने महर्षी कर्वे रोड ओलांडताना त्रास होतो. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय पूल विभागाने घेतला आहे.

या पुलाचे बांधकाम करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अनुराधा पोतदार यांनी पाठपुरावा केल्यानंतर १९ जुलै २०२२ रोजी निविदा मागवण्यात आल्या. या निविदा १९ सप्टेंबर २०२२ रोजी उघडून यामध्ये पात्र ठरलेल्या कंत्राट कंपनीची निवड करण्याचा निर्णय घेतला. या निविदेमध्ये राजाराम कंस्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली असून या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी साडेचार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या पूलाचे बांधकाम केले जाणार आहे. गिरगावला जोडणाऱ्या पुलावर सरकते जिने बसवले जाणार असून हे सरकते जिने सैफी रुग्णालयाजवळ उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी या पुलाचा जिना कर्वे रोडच्या समोरच्या पदपथावर उतरला जात नसला तरी पुनर्बांधणी करताना रुग्णालयाजवळ सरकत्या जिन्यासह केळेवाडीच्या दिशेला ते उतरवले जाईल,असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पुलाचा भाग २०१८मध्ये कोसळल्यानंतर प्रथम ते पूल बंद करण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षांनी ते पादचारी पूल पूर्णपणे तोडून टाकण्यात आले हाते. तेव्हापासून गिरगावकरांकडून या पूलाच्या बांधकामासाठी सातत्याने मागणी होत असून स्थानिक नगरसेविका असलेल्या अनुराधा पोतदार यांनीही सातत्याने महापालिकेशी पाठपुरावा केल्यानंतर अखेर या पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.