देशातील व्यापारी, व्यवसायिक यांच्यातील आर्थिक देवाण घेवाण करणाऱ्या अंगाडीयाला फसवणा-या राजस्थानमधील एका टोळीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानमधील या टोळीला कुमावत टोळी नावाने ओळखली जाते. या टोळीने नुकतीच मुंबईतील एका अंगाडीयाची २० लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या टोळीतील म्होरक्यासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहे.
विक्रम आचाराम कुमावत (२३),मुकेश तगाराम कुमावत (२८), हसमुख पुखराज सुराणा (५२)मोहनलाल कुमावत(३२) आणि विक्रम सुराणा (४७) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. ही टोळी मूळची राजस्थान मधील आहे. मालाड येथील अंगाडीया उज्वल चांडक यांची काही दिवसांपूर्वी २० लाख रुपयांची फसवणूक झाली होती, उज्वल चांडक यांना भुरामल जैन या व्यापाऱ्याच्या नावाने फोन करून त्यांचा मित्र कपडे व्यापारी जितचंद जैन यांचा मुलगा यश जैन यांना २० लाख रुपये इंदोर येथून मुंबईला पाठवायचे आहे, त्यांचा माणूस २० लाख रुपये घेऊन निघाला आहे, त्याला यायला उशीर लागणार असल्यामुळे तुमच्या जवळील २० लाख रुपये तोपर्यंत महावीर जैन या व्यक्तीला देण्यात यावे असे सांगण्यात आले.
अंगाडीया ही सर्व्हिस विश्वासावर चालत असल्यामुळे उज्वल चांडक यांनी २० लाख रुपये दिले. त्यानंतर मात्र भुरामल जैन, जितराज जैन आणि यश जैन या तिघांचे फोन बंद झाले. आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात येताच चांडक यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिंडोशी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ही टोळी राजस्थान येथे पळून जाण्यापूर्वी मालाड कुरार व्हिलेज येथून या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही टोळी अंगाडीया यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यापाऱ्याची माहिती काढून त्या व्यापाऱ्यांच्या नावाने अंगाडीयांना फोन करून पैसे पोहचवण्याच्या नावाखाली फसवणूक करते. या टोळीवर मुंबईसह इतर शहरांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक जीवन खरात यांनी दिली.
Join Our WhatsApp Community