ऑनलाइन फसवणुकीचा नवीन ट्रेंड; चित्रपट रेटिंगच्या नावाखाली फसवणूक

135
चित्रपटाना ऑनलाइन फाईव्ह स्टार रेटिंग देण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचा ट्रेंड सध्या सायबर गुन्हेगाराकडून वापरला जात आहे. सर जे.जे.मार्ग पोलिस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेली व्यक्ती महिला असून तीची  तब्बल ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबई येथील रहिवासी असलेल्या महिलेला २९  नोव्हेंबर रोजी एका अज्ञात महिलेकडून टेलिग्रामवर संदेश प्राप्त झाला. या महिलेने पैसे कमवण्याची ऑनलाइन संधी देण्यासाठी पीडित महिलेशी संपर्क साधला. चित्रपटांना ऑनलाइन फाईव्ह स्टार रेटिंग देण्याच्या बदल्यात चांगले कमिशन मिळेल असे सांगण्यात आले. चित्रपटांना वेबसाईटवर रेटिंग देण्याचे काम आहे. तुम्ही तयार असाल तर तुम्हाला या वेबसाईटबाबत माहिती देण्यात येईल असे त्या महिलेने सांगितले. पीडित महिलेने होकार देताच दुसऱ्या एका महिलेने पीडितेशी संपर्क साधला आणि तिला वेबसाईटची माहिती देऊन, वेबसाइटवर फाॅर्म भरण्यास सांगितले.  महिलेने एका वेबसाइटची लिंक शेअर केली आणि त्याला लॉग इन करण्यास सांगितले.  काम पूर्ण केल्यानंतर, महिलेने पीडितेला खात्री दिली की, ती चांगले पैसे कमवू शकते आणि पैसे थेट वेबसाइटवर तिच्या ई-वॉलेटवर पाठवले जातील. पीडितेने सर्व सूचना घेऊन वेबसाइटवर दिलेला फाॅर्म भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेला काही प्रीमियम शुल्क भरण्यास सांगण्यात आले.

नागरिकांनी अशा भुलथापांना बळी पडू नये 

मोठ्या प्रमाणात कमिशन मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी पीडितेला फिल्म रेटिंग प्लॅटफॉर्ममध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले.  तक्रारदार महिलेने सुरुवातीला एक लाख रुपयांची गुंतवणूक एका बनावट वेबसाइटद्वारे केली.  त्याला वेबसाइटवर मिळालेला नफा दिसत असला तरी ती रक्कम काढू शकत नव्हती. नंतर तिने आरोपींना पैसे काढण्यासाठी अतिरिक्त रक्कम दिली. परंतु त्यानंतरही तीला वेबसाईटवर दिसणारी रक्कम काढता आली नसल्यामुळे  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात तिच्या आले.  पीडित महिलेने जे.जे पोलिस स्टेशन सायबर विभागाच्या अधिका-यांकडे संपर्क साधला. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारच्या फसवणूकीचा हा नवीन ट्रेंड सायबर गुन्हेगारांनी सुरू केला असून, नागरिकांनी त्यांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.