गोखले पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश जारी : रेल्वेच्यावतीने पाडकामाला सुरुवात

188

अंधेरी येथील पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागातील पुलाच्या पाडकामाला अखेर रेल्वेने सुरुवात केली असून टप्प्याटप्प्याने हे काम पश्चिम रेल्वेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत सुरु आहे. दरम्यान रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीला कार्यादेश देण्यात आल्याने रेल्वेकडून पाडकाम पूर्ण झाल्यानंतर या पुलाचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : सेटवरील मेकअप रुममध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या! )

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पूल धोकादायक ठरल्याने या जुन्या पुलाचे पाडकाम रेल्वेने करून या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा पूल धोकादायक झाल्याने मागील ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान हा पूल पाडण्यापूर्वी हलक्या वाहनांसाठी सुरु ठेवता येईल का याची तपासणी विशेष तज्ञांकडून करून घेत त्याप्रमाणे निर्णय घेण्याची सूचना उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व आमदार अमित साटम यांनी केली होती.

दरम्यान रेल्वेच्यावतीने रेल्वे हद्दीतील पुलाच्या पाडकामासाठी आणि महापालिकेच्यावतीने पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. यामध्ये रेल्वेच्यावतीने कंत्राटदाराची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील आठवड्यापासून पूलाच्या पाडकामाला प्राथमिक सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हे पाडकाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेच्यावतीने मेगाब्लॉक घेऊन अंतिम पाडकाम केले जाईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

तर रेल्वेच्या हद्दीतील या पुलाच्या बांधकामामासाठी महापालिकेने निविदा मागवली होती. या निविदेत तीन कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये बारा टक्के उणे दराने बोली लावणाऱ्या ए.बी.इन्फ्राबिल्ड लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला विविध करांसह ९७ कोटी ८० लाख ७० हजार रुपयांना हे कंत्राट देण्यात आले आहे. मागील आठवड्यात या कंपनीचा प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केल्यानंतर रेल्वे हद्दीतील या पुलाच्या बांधकामासाठी कार्यादेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे काम पावसाळ्यासह ८ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित असल्याने पुढील वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

रेल्वे हद्दीतील पूलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला असला तरी महापालिकेच्या हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी दोन वर्षांपूर्वीच कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेच्या या हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १३८ कोटी रुपये खर्च करण्यात येत असून या पुलाच्या बांधकामासाठी आंध्रप्रदेशातील एमएमएस इन्फ्रास्ट्रक्चरल लिमिटेड कंपनीची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. त्या कंपनीलाही यापूर्वी कार्यादेश देण्यात आले आहेत. रेल्वे हद्दीतील कामांसाठी कंत्राटदाराने उणे १२ टक्के भाव लावला असला तरी महापालिकेच्या हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी यापूर्वी नेमलेल्या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा १८ टक्के अधिक दराने बोली लावत काम मिळवले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.