नववर्षाचे स्वागत आणि लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे अनेक नागरिक फिरण्याचे नियोजन करतात. या काळात मुंबईपासून जवळ असल्याने गोवा, कोकणातील काही सुंदर ठिकाणांना पर्यटक भेटी देतात. याच पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने नववर्षाचे काही दिवस विशेष सुविधा सुरू केली आहे.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांकरिता एसटी महामंडळाच्या रत्नागिरी आगारातर्फे खास ‘रत्नागिरी दर्शन’ एसटी फेरी सोडण्यात येणार आहे. येत्या २८ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात एसटी महामंडळाकडून दररोज ही सेवा देण्यात येईल.
सकाळी ८ वाजता रत्नागिरी एसटी बसस्थानकातून बस सुटेल. आडिवरे, कशेळीचे कनकादित्य मंदिर, कशेळीतील देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, टिळक जन्मस्थान, आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे अशा रत्नागिरीतील नयनरम्य पर्यटनस्थळांचे दर्शन या मार्फत नागरिकांना करता येणार आहे. ही बस सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीत परत येईल.
तिकीट किती असणार, आरक्षण कुठे कराल?
या बसकरिता प्रौढांना प्रत्येकी ३००, तर लहान मुलाला प्रत्येकी १५० रुपये भाडे आकारले जाईल. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक (७५८८१९३७७४) किंवा स्थानकप्रमुख (९८५०८९८३२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community