मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात लिपिकांची अर्थात कार्यकारी सहाय्यकांची तब्बल १३२ पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही पदे न भरता महापालिकेच्यावतीने या पदांचे कामकाज करून घेण्यासाठी कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहे. त्यामुळे सफाई खात्यातील ही पदे भरण्यासाठी कोणताही पुढाकार न घेता प्रशासन कंत्राटी कामगारांची मदत घेऊन खात्याचा गाढा पुढे हाकत असल्याचे दिसून येत आहे. कचरा उचलणाऱ्या वाहनांसह मनुष्यबळाची सेवा घेत याचे खासगीकरण करणाऱ्या महापालिकेने आता लिपिकांची पदेही कंत्राटी तत्वावर भरत या विभागाच्या खासगीकरणाचे वर्तुळ पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.
( हेही वाचा : विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्वमध्ये तब्बल ८०३ पाणी गळत्यांचा शोध )
मुंबई महापालिकेच्यावतीने सफाईच्या कामांचे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागात एकूण २८ हजार सफाई कामगार आहेत. त्यात कार्यकारी सहाय्यक पदाची एकूण ३४५ पदे असून त्यातील २२० पदांवरच कर्मचारी कार्यरत आहेत. तर उर्वरीत १३२ पदे ही रिक्त आहेत. त्यातही कार्यरत २२० लिपिकांपैंकी ७ कर्मचारी हे निलंबित आहेत. या रिक्तपदांमुळे खात्यांच्या आस्थापन कामकाजावर मोठा परिणाम होत असून या कामाचा ताण कार्यरत २१३ कर्मचाऱ्यांवर पडत आहे. कर्मचाऱ्यांवर पडणारा हा ताण लक्षात घेता खालील सफाई खात्यातील कामगारांना बढती देऊन ही पदे भरण्याऐवजी किंवा नव्याने जाहिरात देऊन ही पदे भरण्याऐवजी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने चक्क सहा महिन्यांच्या कालावधीकरता कंत्राटी तत्वावर ही पदे भरण्याचा मार्ग निवडला. या कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या पगारावर तब्बल ७० लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागात तब्बल २८ हजार सफाई कामगार असून त्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरच दावे, कुटुंब निवृत्तीवेतन दावे, स्वेच्छा निवृत्ती वेतन दावे तसेच अनुकंपा तत्वावरील भरती व इतर आस्थापनाचे कामकाज हे लिपिक अर्थात या कार्यकारी सहाय्यक वर्गाच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाते. परंतु ही अनेक पदे रिक्त असल्याने तातडीची गरज म्हणून खासगी संस्थेच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवून हे काम करून घेतले जात आहे. सहा महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर या लिपिकांची मदत घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे आजवर रुग्णालयांमध्ये डॉक्टर,नर्सेस तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसह बहुउ्ददेशीय कामगार वर्गाची सेवा ही खासगी संस्थेमार्फत घेतली जात असतानाच आता याचा शिरकाव घनकचरा व्यवस्थापन विभागातही झाला असून भविष्यात अन्य विभागांमध्येही रिक्त पदे न भरता अशाप्रकारे खासगी संस्थांच्यामाध्यमातून सेवा घेऊन महापालिकेच्या एकेका विभागाचे खासगीकरण करण्यास प्रशासन प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community