नव वर्षाचे स्वागत करताना फटाके फोडून करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नववर्षांचे स्वागत करताना तो आनंद अंगाशी येणार नाही याची काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. ३१ डिसेंबर रोजी रात्री १० ते १२ या वेळेतच फटाके फोडायला परवानगी असणार आहे. तर हॉटेल, परमीट रूमला पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. यासह बिअर शॉपी व वाईन शॉप पहाटे १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
(हेही वाचा – पॅराग्लायडिंग करताय? जरा जपून… पॅराग्लायडर अपघातात पुण्याच्या पर्यटकाचा मृत्यू)
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात यंद नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार तरूणाईने नववर्षाचा जल्लोष करावा, असे आवाहनही केले आहे.
अन्यथा होणार गुन्हा दाखल
रेसिडेन्सी भागात फटाक्यांचा आवाज ५५ डेसिबलपर्यंतच असावा. तर कर्मशियल भागात ६५ डेसिबल एवढाच आवाज असणे अपेक्षित आहे. रात्री १० ते १२ वाजेपर्यंतच फटाके वाजवायला परवानगी आहे. त्याशिवाय इतर वेळेत फटाके वाजविणाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.
यासह मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच असणार आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही, यादृष्टीने पोलिसांची गस्त असणार आहे. तर नववर्षाच्या स्वागतावेळी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसतील, मात्र कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाताळ व नववर्षानिमित्त परमीट रूम, हॉटेल, ढाबे, बिअर शॉपी, वाईन शॉपच्या वेळांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचे आदेश काढून हॉटेल, परमीट रूमला पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. तर बिअर शॉपी व वाईन शॉप पहाटे एक वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र हा बदल २५ डिसेंबर व ३१ डिसेंबर या दोन दिवसांसाठीच करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community