चीनमध्ये थैमान घालणा-या ओमायक्रॉनच्या बीएफ.७ या विषाणूच्या प्रसाराचा वेग लक्षात घेत भारतात लॉकडाऊनची गरज नाही, असे स्पष्ट मत ‘द इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. कोरोनाची लाट असो वा नसो प्रत्येकाने आता कायमस्वरुपी सार्वजनिक ठिकाणी भेटी देताना तोंडावर मास्क घालावे जेणेकरुन प्रदूषण तसेच इतर श्वसनाचे किंवा हवेवाटे होणा-या आजारांपासून प्रत्येकाचे संरक्षण होईल, कोरोनाची भीती मनातून काढून टाका, असा सल्ला डॉ. गंगाखेडकर यांनी दिला.
बीएफ.७ मुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही
ओमायक्रॉन हा विषाणू घातक नाही. या विषाणूचा प्रसार पटकन होत असल्याचे भारतात याअगोदरही आढळून आले. ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेल्या बीए.५ चा बीएफ.७ हा उपप्रकार आहे. या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने केवळ जगभरात या विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतील. चाचणी वाढवल्यास भारतातही या विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढलेलीच दिसून येईल. चीनची लोकसंख्या जगभरात जास्त आहे. चीनमध्ये वयोगटानुसार ज्येष्ठांची संख्या सर्वात जास्त दिसून येते. परिणामी कोरोना चीनमध्ये ज्येष्ठांमध्ये जास्त पसरला. जगभरात कुठेही बीएफ.७ मुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनमुळे जागतिक पातळीवर आर्थिक दरी
कोरोनाच्या सुरुवातीला चीनपाठोपाठ जगात लॉकडाऊन झाले. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच होते. लॉकडाऊनमुळे जागतिक पातळीवर आर्थिक दरी निर्माण झाली. लॉकडाऊनमुळे श्वसन आणि हवेद्वारे होणारे आजार थांबवता येत नाही, याचा अनुभव प्रत्येक देशाच्या प्रतिनिधींना आला. कोरोना म्हटलं की लोकांना डेल्टा या घातक विषाणुमूळे आलेली दुसरी लाट आठवत आहे. त्यावेळी रुग्णांसाठी ऑक्सिजन तसेच रुग्णालयात खाटांची कमतरता भासली होती. नव्या लाटेसह पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती प्रत्येकाच्या मनात घर करुन राहिली आहे. सर्दी, खोकलाच्या रुग्णांनी काही दिवस घरात आराम करा, श्वसनाचे आजार वाढत असल्यास दमेकरी तसेच वृद्धांनी काही काळ घराबाहेर जाणे टाळा, अशा उपायांनी आजारांचा उद्रेक टाळता येतो, असेही डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.