२०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप यांनी युती करून लढवली, त्यानंतर निकाल लागल्यावर मुख्यमंत्री पदाच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला.
काय म्हणाले शिवतारे?
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. शिंदे गटाचे बंड झाल्यानंतर हे बंड कसे झाले याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात विजय शिवतारे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची घोषणा झाली. मात्र निवडणूक कशी लढवायची हे आधीच ठरले होते. कोणत्या जागांवरचे उमेदवार पाडायचे, कुणाला विजयी करायचे हे सगळे ठरले होते. आता जे काही सुरू आहे ते फक्त लोकांना फसवणे सुरू आहे, असेही विजय शिवतारेंनी उद्धव ठाकरेंबाबत म्हटले आहे. बहुमताचे आकडे कसे जुळवायचे हे निवडणुकीच्या आधीच ठरले होते, असे विजय शिवतारेंनी सांगितले, तसेच ७० जागांवर शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे करून त्या जागा घालवण्यात आल्या. हे सगळे उद्धव ठाकरेंनी केले. निवडणुकीच्या आधीच ही सगळी सेटलमेंट झाली होती. कुठल्या जागा पाडायच्या, कुठल्या जागा जिंकायच्या आकडेवारी कशी जुळवून आणायची हे सगळे कारस्थान होते, असेही विजय शिवतारेंनी म्हटले. महाविकास आघाडी निकालानंतर झाली नाही ती त्याच्या आधी झाली होती. जे सरकार निर्माण झाले ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते, असेही विजय शिवतारे यांनी म्हटले. मुंबईतील एका सभेत बोलताना, एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले, असा दावाही विजय शिवतारे यांनी केला.
(हेही वाचा 2,50,000 नागरिकांना गिळंकृत करणारी ख्रिसमसनंतरची ‘ती’ काळरात्र)
Join Our WhatsApp Community