राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलावर सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अतिरिक्त ताण आहे. तो दूर करण्यासाठी १८ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि प्रशिक्षण पूर्ण करून, हे नवोदित पोलिस प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यास तीन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. त्यामुळे आणखी ३ वर्षे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण राहणार असल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र पोलिस दलात १८ हजार ३३१ पदांची भरती करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यात प्रत्येक विभागनिहाय पोलिस शिपाई पदाच्या १४ हजार ९५६, तर चालक पोलिस शिपाई पदाच्या २ हजार ७४ जागांचा समावेश आहे. त्या शिवाय राज्य राखीव पोलिस दलात १ हजार २०४ जवानांची भरती केली जाणार आहे. या जागांसाठी १८ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
पोलिस भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यातील प्रमुख अडथळा म्हणजे जागा कमी आणि उमेदवार अधिक, अशी स्थिती. या भरतीसाठी १८ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. लेखी परीक्षेची चाळणी लावली, तरी किमान ५ लाख उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील. आपल्याकडे उपलब्ध यंत्रणेनुसार एका दिवसात १ हजाराहून अधिक उमेदवारांची चाचणी घेता येत नाही, हे आव्हान आहे. दिवसाला १ हजार याप्रमाणे ५ लाख जणांची शारीरिक चाचणी घ्यायची झाल्यास, ५०० दिवस म्हणजेच जवळपास १७ महिन्यांहून अधिक काळ लागेल. त्यानंतर पात्र उमेदवारांचे एका वर्षाचे प्रशिक्षण होऊन त्यांना सेवेत दाखल करून घेतले जाईल. या प्रक्रियेस किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी ३ वर्षे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण राहणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सेवा-समर्पित राष्ट्राभिमानी कार्यकारिणीला पुन्हा संधी!)
शारीरिक चाचणीला विलंब का लागतो?
- पोलीस शिपाई पदासाठी तीन प्रकारच्या शारीरिक चाचण्या घेतल्या जातात. त्यात पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण) आणि गोळाफेक (१५ गुण) आदींचा समावेश आहे.
- महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) अशी शारीरिक चाचणी पद्धत आहे.
- शारीरिक चाचणी घेताना एकावेळी सर्व उमेदवारांना बोलावता येत नाही. दिवसाला १ हजार याप्रमाणे टप्प्याटप्प्याने चाचणी घेतली जाते.
- त्यातही ५० किंवा १०० उमेदवारांचा गट करून त्यांना १६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उतरवले जाते. त्यात पात्र ठरलेल्यांना १०० मीटर धावणे आणि त्यात पात्र ठरलेल्यांची गोळाफेक चाचणी घेतली जाते.
- धावण्याच्या चाचणीत घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवावे लागते. कारण कोणता उमेदवार किती वेळेत अंतिम रेषा पार करतो, यानुसार गुण दिले जातात.
- गोळाफेकच्या बाबतीतही लांबीनुसार गुण दिले जात असल्याने प्रत्येक उमेदवाराने गोळा फेकल्यानंतर त्याचे मोजमाप करावे लागते. त्यामुळे ही प्रक्रिया काहीशी वेळकाढू आहे.
निवडणुकीमुळेही अडथळे
येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात मुंबई, ठाण्यासह, पुणे आणि औरंगाबाद पालिकेच्या निवडणुका अटीतटीच्या ठरणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करावी लागणार असल्याने पोलिस भरतीसाठी नियुक्त केलेले कर्मचारीही तिकडे पाठवावे लागतील. परिणामी, या काळात भरती प्रक्रिया बंद ठेवावी लागणार असल्याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले.