२०२२ या वर्षांला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पुन्हा एकदा सज्ज होताना दिसत आहे. मुंबईत वर्षभरात झालेल्या गुन्ह्याचा आढावा घेतल्यास २०२२ हे वर्ष महिलांवरील गुन्हे, जबरी चोरी, चोरी आणि खंडणीच्या गुन्ह्यांसाठी गेल्या वर्षांच्या तुलनेत पुढे असले, तरी हत्या आणि हत्येचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात मागे पडले आहे.
मुंबईत २०२२मध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यात घट झालेली दिसून येत असली शहरात महिलांवरील गुन्हे आणि इतर गुन्ह्यात वाढ झालेली मुंबई पोलिसांच्या वर्षभराच्या गुन्ह्याच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे.
मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दररोज कुठे न कुठे हत्या, दरोडा, जबरी चोरी बलात्कार, खंडणी, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे घडत असतात. वर्ष सरत असताना या गुन्ह्याची वजाबेरीज केली जाते. मुंबईतील कुठल्या पोलीस ठाण्यात किती गुन्ह्याची नोंद झाली, किती गुन्हे उघडकीस आले, किती गुन्हे तपासाधीन आहेत याबाबतची सर्व आकडेवारी मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात येते. या आकडेवारीवरून प्रत्येक वर्षी गुन्ह्यात होणारी वाढ आणि घट कळते. २०२२ हे वर्ष मुंबईकरांसाठी बऱ्यापैकी शांततेत गेले, मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण झाला नसला तरी काही गुन्ह्यामध्ये नक्की वाढ झालेली दिसून येते, तर काही गंभीर गुन्ह्यात घट देखील झालेली पहाता येते.
(हेही वाचा तुनिषाला झीशानने ‘वापरले’; आईचा गंभीर आरोप )
४५ हजार ४३ गुन्ह्यांची उकल
मुंबईत १ जानेवारी ते ३१ नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात लहान मोठे असे एकूण ६६ हजार ७८० गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ४५ हजार ४३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. म्हणजे या वर्षात ६७ टक्के गुन्हे उघडकीस आलेले आहे. २०२१ या वर्षाच्या तुलनेत ५ हजार २८६ गुन्हे २०२२ मध्ये वाढले आहे. २०२१मध्ये ११ महिन्यांत ६१ हजार ४९४ गुन्हयांची नोंद मुंबईत झाली होती. त्यापैकी ८३ टक्के गुन्हे उघडकीस आले होते. २०२२मध्ये मुंबईत हत्या आणि हत्येचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यांची घट झाली असून मागील अकरा महिन्यांत मुंबईत हत्याचे १२० तर हत्येचा प्रयत्न २२७ गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी हत्येच्या ११७ गुन्हयाची उकल करण्यात आलेली आहे. २०२१ च्या तुलनेत हत्याच्या गुन्ह्यात ३२ तर हत्येच्या प्रयत्न या गुन्हयात १२५ ने घट झाल्याचे दिसून येते. परंतु चिंतेची बाब ही आहे की २०२१च्या तुलनेत चोरी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, खंडणी आणि महिलांवरील गुन्ह्यात मुंबईत मोठी वाढ झाल्याचे एकंदर आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
ही आहे गुन्ह्याची आकडेवारी २०२२…..
हत्या – १२०, उकल ११७, हत्येचा प्रयत्न – २२७, उकल २२४, जबरी चोरी – ८२५, उकल ७०१, सोनसाखळी चोरी-१८१, उकल १४४, खंडणी- २८८, उकल १८७, घरफोडी – १५६३, उकल ८९५, चोरी- १४,२१५ उकल २,९४८, वाहन चोरी- २८०२, उकल १४३०, बलात्कार- ८८५, उकल ८०४, विनयभंग –२१४६, उकल १७३४,अपहरण – १०३६, उकल ९०८
२०२१आकडेवारी ….
हत्या – १५२, उकल १५०, हत्येचा प्रयत्न- ३३२, उकल ३२१, जबरी चोरी- ६८९, उकल ६३३, सोनसाखळी चोरी– १४१, उकल १०८, खंडणी २५२, उकल २०३, घरफोडी- १५६३, उकल ८५० चोरी- ४०९८, उकल १६४२ वाहनचोरी– ३०१२, उकल १४२४, बलात्कार ८२८, उकल ७३७, विनयभंग – १९१६, उकल १६०६ आणि अपहरण ९९९, उकल ८५९.
Join Our WhatsApp Community