मुंबई महापालिका आयुक्तांना कर्करोगावरील प्रोटॉन थेरपीचा विसर!

144
कर्करोगावरील उपलब्ध अद्ययावत उपचार प्रणालींपैकी एक प्रोटॉन थेरपी या सुविधेची उभारणी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. टाटा कर्करोग रुग्णालय यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या या सुविधेचा विसरच महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाला पडला आहे. कर्करोगाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जी सुविधा अति महागडी आणि केवळ परदेशातच मिळत असते, ती सुविधा गरीब कर्करोगाच्या रुग्णाला महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध व्हावी, अशी इच्छा महापालिका प्रशासनाची दिसत नाही.
मुंबईमध्ये कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी परळमध्ये एकमेव टाटा रुग्णालय असून महापालिकेच्या  रुग्णालयांत या आजारांवर केमो थेरेपी करण्याची उपचार पध्दतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र महापालिकेचे कर्करोगाचे रुग्णालय नसून या वाढत्या आजारावरील वैद्यकीय उपचार गरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावेत यासाठी कर्करोगावरील महापालिकेच्या अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.  या केअर सेंटरच्या स्थापनेसाठी महापालिकेच्यावतीने क्रसना डायग्नोस्टीक्स लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली होती. दरम्यान, सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कर्करोगावरील प्रोटॉन थेरपी सुविधेची उभारणी टाटा रुग्णालयाच्या मदतीने केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती.
महापालिकेच्या सर्वसामान्य व आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांकरता कर्करोगावरील अचूक व अत्यंत किफायतशीर दराने उपचार करून देण्यासाठी, अद्ययावत प्रोटॉन बीन थेरपी सुरु करण्याची महत्वाकांक्षी योजना महापालिकेने आखली होती. ज्यात कमीत कमी डोस देऊन अधिकाधिक कर्करोगांच्या पेशी नेष्ट करून, केमोथेरपीचे सर्व दुष्पपरिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी व केवळ ट्यूमरला लक्ष्य करणारी रेडीएशन प्रकारातील प्रोटोन थेरेपी ही कॅन्सरवर सर्वात अत्याधुनिक व प्रभावी  उपचार पध्दती मानली जाते.
प्रोटॉन थेरपीसाठी सध्या १५ ते १८ लाख रुपयांचा खर्च येतो, त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सुरु केल्यानंतर रुग्णांना अवघ्या पावणे दोन लाखांमध्ये हा उपचार मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी खर्च केलेली रक्कम पुन्हा महापालिकेला प्राप्त होणार असून, प्रोटॉनच्या माध्यमातून महापालिकेच्या डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यामुळे भावी तरुण पिढीच्या शिक्षणासाठी पावणे चारशे कोटींची केलेली तरतूद असो भावी पिढीच्या आरोग्याच्या विचार करत ही योजना तथा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. परंतु कॅलेंडर वर्ष उलटत आले तरी आयुक्त तसेच आरोग्य विभागाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
प्रोटोन थेरेपी सुरु करण्यासाठी या प्रकल्पासाठी ३ एकर क्षेत्रफळाची जागेची आवश्यकता असून यासाठी वडाळा कृष्ठरोग  रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली होती. अशाप्रकारचा  हा प्रकल्प भारतात  प्रथमच राबवण्यात येत असल्याने करण्यात येत असल्याने, क्रसना डायग्नोस्टीक्स लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार म्हणून निवडही करण्यात आली होती. परंतु पुढे हा प्रस्तावच बासनात गुंडाळून ठेवला असून, कोविडच्या कामाचे कौतुक करून घेताना भारतातील हा महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणारा हा प्रकल्प  होऊ नये यासाठी नक्की कुणाची इच्छा आहे, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. एका बाजूला मुंबईच्या सुशोभिकरणावर करोडो रुपये खर्च करण्यात येत असत असताना भविष्यातील कर्करोगासारख्या जर्जर आजारावर गरीब व गरजू रुग्णांना उपचार घेता यावेत यासाठी पैसे खर्च करायला आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाचे अधिकारी आखडता हात घेत आहे. त्यामुळे  मुंबईचे सुशोभीकरण महत्वाचे की कर्करोगावरील आरोग्य सुविधा असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.