नववर्षाच्या स्वागतासाठी विकेंडला फिरायला जाण्याचा तुमचा प्लान असले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सातारा जिल्ह्यातील वासाटा किल्ल्यावर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा… कारण वासाटा किल्ल्यावर ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची गर्दी तसेच गर्दीतील हुल्लडबाजांचा जंगली प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी वन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – २०२२ मध्ये गुगलवर सर्च करण्यात आलेले ५ प्रश्न कोणते?)
सुट्टीच्या दिवशी, विकेंडला टेकर्स तसेच पर्यटक वासोटा या किल्ल्यावर येतात. अनेकांना निर्सगाच्या सान्निध्यात राहायला आवडते. त्यातच आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. या पार्श्वभूमीवर वासोटा या किल्ल्यावर तीन दिवस पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वासोटा किल्ला हा वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्गसंपदेला तसेच वन्यजीवांना कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी पर्यटकांना शुक्रवारपासून ३० डिसेंबर ते रविवार १ जानेवारीपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, वन विभागाने कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बामणोली, तापोळा विभागातील बोट चालकांना याबाबत सूचना दिली आहे. या काळात वासोटा किल्ला परिसरासह अभयारण्यात्या गाभा क्षेत्रात कोणी व्यक्ती बेकायदेशीररित्या आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाआ करण्यात येईल, अशी माहिती बामणोली वन्यजीव विभागाकडून देण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांगानमधील सातारा-रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरचा एक भाग हा वासोटा किल्ला आहे. जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रात शिवसागर जलाशयाच्या पलीकडे वासोटा किल्ला असल्याने अनेक पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू हा किल्ला आहे.
Join Our WhatsApp Community