प्रशिक्षित ४० कबुतरांची चोरी; कबूतर चोराला अटक

148
प्राशिक्षित केलेले ४० एवीयन कबुतरांची चोरी करणाऱ्या कबूतर चोराला चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे. हा चोर कुर्ला कुरेशी नगर येथून या कबुतरांची चोरी करून त्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात होता. चोरी केलेले कबुतर हे प्रशिक्षित कबूतर असून एवीयन कबूतर म्हणून ओळखले जातात.
मुज्जाबिल उर्फ जिशान वारीस खान (२३) असे अटक करण्यात आलेल्या कबूतर चोराचे नाव आहे. मुज्जाबिल हा कुर्ला पूर्व कुरेशी नगर या ठिकाणी राहण्यास आहे. त्याच परिसरातील अहमद खलील सय्यद (२५) यांना कबूतर पाळण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे ४० प्रशिक्षित कबुतर होते. या कबुतरांना त्याने एक विशिष्ठ प्रकारे प्रशिक्षण दिले होते. त्याने पाळलेले हे कबूतर कितीही दूर गेले तरी ते पुन्हा आपल्या मालकाकडे परत येत असतं. मालकाने घातलेली शीळ त्यांना ओळखता येत असे, अशा पद्धतीने या कबुतरांना अहमद यांनी प्रशिक्षण दिले होते. गेल्या महिन्यात अहमद यांच्या घरा बाहेर असणाऱ्या कबुतरांच्या खुराड्यातून ४० प्रशिक्षित कबूतर चोरीला गेले होते.

( हेही वाचा: BSF जवानाची निर्घृण हत्या; हत्येप्रकरणी 7 जण अटकेत )

सीसीटीव्ही वरून आरोपी अटक….

प्रशिक्षित कबूतर असल्यामुळे ते परत येतील या आशेने अहमद दोन दिवस कबुतरांची वाट पाहात होता, मात्र ते परत न आल्यामुळे अखेर अहमद याने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे आणि पथक यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता कबुतर चोरांची ओळख पटवण्यात आली. कुरेशी नगर येथेच राहणारा स-हाईत गुन्हेगार मुज्जबिल याने कबुतरांची चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अखेर त्याला मागच्या आठवड्यात अटक केली.

वेगळेपण असणाऱ्या गोष्टी चोरायचा

मुज्जबिल याने चोरी केलेले कबुतर विकले नव्हते, त्याने एका अज्ञात ठिकाणी ते एका खुराड्यात बंद करून ठेवले होते.  या कबुतरांना चांगली किंमत देणाऱ्या ग्राहकाच्या शोधात तो होता, अशी माहिती पो.उ नि सचिन सरडे यांनी दिली. अटक करण्यात आलेला मुज्जबिल हा सराईत गुन्हेगार असून कसाईवाडा परिसरात त्याची दहशत आहे. त्याच बरोबर अलिबाग, खोपोली, नवी मुंबईत त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मुज्जबिल याची एक खासियत आहे तो वेगळेपण असणारी वस्तू चोरतो.  अलिबाग येथून त्याने दोन प्रशिक्षित बोकड चोरी केले होते, तर खोपोली येथून एक यामाहा मोटारसायकल चोरी केली होती. या मोटरसायकल मालकाने यामाहा मोटर सायकल वर सुमारे ३ लाख रुपये खर्च करून मोडीफाय केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.