महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेचे बाण सोडणाऱ्या सुषमा अंधारे यांचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस यांनी साधलेल्या करेक्ट टायमिंगची सध्या विधानभवनात चर्चा आहे. उद्धव ठाकरे सदस्य असलेल्या विधानपरिषद सभागृहात फडणवीसांनी अंधारेंवर जोरदार हल्लाबोल करीत विरोधकांची कोंडी केली.
( हेही वाचा : गृहस्वप्न साकार होणार! म्हाडाकडून नववर्षाची भेट, सोडत प्रक्रियेत महत्त्वाचा बदल…)
गेल्या काही महिन्यांपासून सुषमा अंधारे शिंदे-फडणवीस सरकारवर पातळी सोडून टीका करीत असल्या, तरी आजवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर विधिमंडळात उपस्थित असल्याचे टायमिंग साधत, फडणवीसांनी अंधारेंवरून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
विधानपरिषद सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सुषमा अंधारे म्हणतात की, राम आणि कृष्ण थोतांड आहेत. सीतामातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोरं खात बसतो. कुछ हुवा तो क्या हमने तुमको देखा, तुमने हमको देखा हे बोललं जातं. कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो. कृष्ण पुन्हा अवतरत नाही. तो कुठल्यातरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा, असं तुमचं नेते म्हणतात त्यावर तुम्ही काही बोलत नाहीत. त्यावर तुम्ही मुक गिळून बसतात. या देशातील लोकं इतके मेरिटवाले होते की, माकडं पूल बांधत होती, अशा शब्दांत आमच्या रामाबद्दल बोललं जातं. तेव्हा अपमान होत नाही का, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालता
शंभूराजेंबद्दल ज्या पुस्तकारत आक्षेपार्ह लिहिलं आहे. ते पुस्तक वाचून सुप्रिया सुळे इंटरेस्टिंग असं बोलतात. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल लालू प्रसाद यादव काय म्हणाले होते. पण तुम्ही त्यांच्याच मुलाला भेटायला गेले होते. परब साहेब तुम्ही कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण नाही दिलं. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकारांना माफीवीर म्हणाले. त्यांच्या गळ्यात गळे घालून तुम्ही फिरताय. कृष्ण, राम आणि सीतामातेचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या पक्षात आहेत, असा हल्लाबोलही फडणवीसांनी केला.
Join Our WhatsApp Community