मुंबईच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी मुंबई सौदर्यींकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात विद्यमान उद्यान आणि मैदानाची योग्यप्रकारे देखभाल केली जात नसल्याने या मोकळ्या मनोरंजनाच्या जागाच बकाल पडल्या आहेत. अनेक उद्यान व मैदानांच्या खेळाच्या साहित्यांसह, विजेचे दिवे नादुरुस्त अवस्थेत पडले आहेत. या उद्यान व मैदानांच्या देखभाल दुरुस्तीकरता निधीच उपलब्ध नसल्याने आजही अनेक मोकळ्या जागा सुविधेअभावी पडल्या असून नागरिकांना या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
( हेही वाचा : MPSC Recruitment : आरोग्य विभागात मेगाभरती! जाणून घ्या कोणत्या पदांसाठी किती जागा?)
मुंबई महापालिकेच्या उद्यान, मनोरंजन मैदान, क्रीडांगण, वाहतूक बेट यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेने २४ विभागांकरता स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या निविदेमध्ये कंत्राटदारांनी अंदाजित रकमेपेक्षा ४० ते ४५ टक्के दराने बोली लावून काम मिळवल्याने प्रशासनाने ही निविदा रद्द करून निविदेत भाग घेणाऱ्या कंत्राटदारांची अनामत रक्कम जप्त केली होती. त्यानंतर मागवलेल्या निविदेतही कंत्राटदारांनी तेवढीच बोली लावत काम मिळवले. त्यामुळे या सर्व उद्यान, मनोरंजन मैदान, क्रीडांगणाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असली तरी सन २०१७ व २०१८मध्ये नुतनीकरण केलेल्या अनेक मोकळ्या जागा या देखभाल व दुरुस्ती अभावी बकाल अवस्थेत पडलेल्या पहायला मिळत आहेत.
महापालिकेने यासर्व मैदान, उद्याने आणि क्रीडांगणाच्या नुतनीकरणासाठी ठोक निधीची तरतूद न केल्याने उपलब्ध निधीमधून देखभाल व दुरुस्तीची कामे केली जात आहे. मात्र, अनेक मोकळ्या मनोरंजन मैदान व उद्यानांच्या सामानांची नासधूस झाली आहे, विजेचे दिवे बंद पडले आहे, लाद्या उखडल्या आहेत. मात्र, ही सर्व कामे मोठ्या स्वरुपाची असल्याने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून ही कामे केली जात नाही तसेच निधी नसल्याने उद्यान विभागाच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही.
सन २०१७-१८मध्ये नुतनीकरण केलेल्या विलेपार्ले येथील वीर सावरकर उद्यानातील सुशोभिकरणाअंतर्गत बसवण्यात आलेले विजेचे दिवे मागील आठ ते दहा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे उद्यानात अंधार पसरलेला असून याबाबत स्थानिक नगरसेवक अभिजित सामंत यांनी के पूर्व विभागातील उद्यान विभागाला याची कल्पना देऊनही यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा न झाल्याने अखेर सोमवारी २६ डिसेंबर रोजी त्यांनी उद्यान अधिकाऱ्याच्या कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश योजनेकरता हॅलोजन लावून देण्याचा प्रयत्न केला झाला. प्रकाशाअभावी निर्माण झालेल्या अंधारामुळे नागरिकांना वॉकींग ट्रॅकवरुन चालण्यास अनेक अडचणी येत होत्या. ज्येष्ठ नागरिक या अंधारात पडण्याची भीती असल्याने सामंत यांच्या आंदोलनांतर महापालिकेने पुढील आठ दिवसांमध्ये प्रकाश दिव्यांचे काम करण्याचे आश्वासन दिले. सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चिंतामणी धरणे, शंकर सरोज, संतोष सलागरे, राज गुप्ता, चंद्रकांत पंड्या, जितेश पटेल, रमेश मकवाना, विकास शर्मा, विश्वनाथ तावडे, सचिन शर्मा, संगीता चोणकर, नयना कचोलिया सहभागी झाले होते.
याबाबत अभिजित सामंत यांनी ही केवळ सावरकर उद्यानाची परिस्थिती नसून संपूर्ण मुंबईत अशाप्रकारे अनेक उद्यान, मैदान आणि क्रीडांगणांची देखभाल होत नसून नुतनीकरण तर बाजुला राहिले, साधी देखभालही होत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व उद्यान, मैदानांची देखभाल करून जनतेला चांगल्याप्रकारची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवा,असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community