सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण्यासाठी सर्व राज्यात 14567 हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डर लाईन 14567) चालवली जाते.
( हेही वाचा : MPSC Recruitment : आरोग्य विभागात मेगाभरती! जाणून घ्या कोणत्या पदांसाठी किती जागा?)
राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे हा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तीची काळजी घेणे तसेच इतर सेवांसाठी ही हेल्पलाईन उपयोगी ठरणार आहे. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14567 असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरु राहणार आहे. हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
हेल्पलाईनच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा
हेल्पलाईनमार्फत आरोग्य, उपचार, निवारा, वृध्दाश्रम, डे केअर सेंटर, ज्येष्ठांसंबंधित अनुकूल उत्पादने तसेच सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला व करमणूक इत्यादीबाबत माहिती दिली जाते. यात कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकरण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती पुरविली जाते. क्षेत्रिय पातळीवर बेघर, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तीची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत आहे. तरी गरजू ज्येष्ठांनी मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community