मुंबईत आगीच्या वर्दीवर किंवा आपत्कालिन परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाने दहा मिनिटांमध्ये प्रतिसाद देण्याचे केंद्रीय मार्गदर्शक धोरणात असले तरी प्रत्यक्षात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचत नाही. सध्या अग्निशमन दलाची ३५ केंद्र असली तरी या केंद्रांपासून आगीची घटना दूर घडल्यास अरुंद , दाटीवाटीचे रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे दहा मिनिटांमध्ये दलाचे जवान पोहोचू शकत नाही. त्यामुळे जलद प्रतिसाद मिळण्यासाठी महापालिकेच्यावतीने, महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये ३६५ दिवस जवानांसह अग्निशमन दलाची गाडी तैनात केली जाणार आहे. महापालिकेच्या २२ विभाग कार्यालयांमध्ये अशाप्रकारची अग्निशमन दलाची वाहने तैनात केली जाणार असून येत्या पावसाळ्यापूर्वी या सर्व गाड्या सेवेत येतील. यामुळे आगीच्या घटनांसह इतर आपत्कालिन प्रसंगी ही वाहने घटनास्थळी पोहोचून प्राथमिक बचावकार्य करतील.
( हेही वाचा : मुंबईतील उद्यान, मैदान आणि क्रीडांगणे सुविधेअभावी बकाल )
भारत सरकारच्या गृह मंत्रालयान प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, एखाद्या आगीच्या ठिकाणी व इतर आपत्कालिन परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाने १० मिनिटांच्या आत प्रतिसाद देणे आवश्यक आहे. परंतु सध्या उपलब्ध अग्निशमन केंद्राच्या संख्येमुळे हे उद्दिष्टय साध्य होत नसल्यामुळे महापालिकेच्या २२ विभाग कार्यालयांमध्ये जलद प्रतिसाद वाहने, प्रशिक्षित मनुष्यबळासह २४ बाय ७ याप्रकारे ३६५ दिवस उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेतला.
यासाठी २२ वाहनांची खरेदी आणि प्रशिक्षित जवानांच्या मनुष्यबळासह पुरवठा करण्यासाठी आर्यन पंप्स एण्ड एन्वायरो सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सुमारे १८१ कोटी रुपये खरेदी केली जात आहे. त्यामुळे येत्या मे २०२३पर्यंत ही सर्व अग्निशमन वाहने विभाग कार्यालयांमध्ये तैनात केली जाणार आहेत. या वाहनांचा उपयोग अग्निशमन व विमोचन कार्यासाठी होणार आहे. ही वाहने महापालिकेच्या २२ विभाग कार्यालयांमध्ये तैनात करून, ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या, दाट वस्ती, अरुंद रस्ते असणाऱ्या परिसरामध्ये लागणाऱ्या आगीवर त्वरीत प्रतिसाद देण्याकरता उपयोगात येणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागाच्या हद्दीमध्ये दुघर्टना घडल्यास, ही वाहने प्रथम प्रतिसादात्मक वाहने म्हणून दुर्घटनास्थळी पेाहोचतील व अग्निशमन दलाची नियमित वाहने पोहोचेपर्यंत मदत कार्याला सुरुवात करतील. ज्यामुळे नागरीकांना जास्त प्रभावीपणे सेवा देणे शक्य होईल तसेच जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होईल, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या भायखळा ई विभाग व ग्रँटरोड डी विभाग कार्यालयाजवळ अग्निशमन केंद्र उपलब्ध असल्यामुळे फक्त २२ विभाग कार्यालयांमध्ये जलद प्रतिसाद वाहने प्रशिक्षित मनुष्यबळासह २४ तास तैनात राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई अग्निशमन दलाचे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ही अतिरिक्त सेवा घेतली जात असल्याने वाहने खरेदी करणाऱ्या संस्थेकडूनच प्रशिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा व पुढील चार वर्षांची देखभालीसह या संस्थेला कंत्राट दिले असून ही केवळ सुविधा आहे. यामध्ये अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील एकही पद कमी केले जाणार नाही. उलट केंद्रांची संख्या वाढेल त्याप्रमाणे आस्थापनेवरील पदेही वाढवली जाणार आहे. विभाग कार्यालयांमध्ये तैनात करण्यात येणारी वाहने ही अतिरिक्त सेवा असल्याने बाहेरील संस्थेकडून प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घेतली जाणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.
अशाप्रकारे असतील वाहनांमध्ये मनुष्यबळ व साहित्य
- प्रत्येक वाहनांमध्ये एक चालक, एक सुपरवायझर, २ प्रशिक्षित अग्निशामक
- अग्निशमक व सुपरवायझर तसेच चालक हा एसएफटीसी मुंबई, एनएफएससी नागपूर किंवा सरकार मान्यप्राप्त संस्थेमधून सहा महिन्यांचा अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल.
- वाहनांमध्ये पाणी व फोम टँक, वॉटर मिस्ट फायटींग सिस्टीम, पीटीओ, विमोचन उपकरणे, श्वसन उपकरणे, टेलिस्कोपिक मास्टसह पोर्टेबल एलईडी लाईट, विद्युत मनोरा, स्ट्रेचर, व इतर साहित्य.