‘करेक्ट कार्यक्रम’ हा अलीकडे राजकारणात परवलीचा शब्द बनला आहे. सत्ताधारी-विरोधक निवडणुकीच्या आखाड्यात वेळोवेळी एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करताना दिसतात. मात्र, विधिमंडळ सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करीत आपले फ्लोअर मॅनेजमेंटचे कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले.
विधानसभेच्या बुधवारच्या कार्यक्रमानुसार, प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना झाल्यानंतर लोकायुक्त विधेयक चर्चेला येणार होते. मात्र, चर्चेच्या फेऱ्यात विधेयक मंजूर होण्यास विलंब होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या वेळेत संधी साधण्याची रणनीती आखली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अब्दुल सत्तार यांची पाठराखण केली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी गायरान घोटाळ्याबाबत विधानसभेत स्पष्टीकरण दिले. परंतु या स्पष्टीकरणावर समाधानी न झालेल्या विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला.
असा झाला करेक्ट कार्यक्रम
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर संधी हेरत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना इशारा केला. त्यानंतर तातडीने विधानसभा कामकाजाचा क्रम बदलून लोकायुक्त विधेयक चर्चेला घेण्यात आले. मंत्री दीपक केसरकर यांनी हे विधेयक मंजुरीसाठी मांडले. त्यानंतर कोणतीही चर्चा न होता हे विधेयक मंजूर करण्यात आले.
Join Our WhatsApp Community