रेल्वे विभाग आणि पोस्टाच्या (टपाल) माध्यमातून नागरिकांसाठी लवकरच घरपोच पार्सल सेवा सुरू करण्यात येणार आहे. नागरिक आता घरबसल्या त्यांच्या विविध वस्तू आणि औद्योगिक कंपन्या त्यांचा माल हव्या त्या ठिकाणी पाठवू शकणार आहेत. त्यासाठी रेल्वे व पोस्टाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु असून दोन आठवड्यात ही सेवा सुरू होणार आहे. या सेवेला ‘गतिशक्ती एक्सप्रेस कार्गो सेवा’ असे नाव देण्यात आले आहे.
( हेही वाचा : नववर्षात मुंबईत ‘बेस्ट’चे स्मार्ट वीज मीटर, मोबाईलप्रमाणे करता येईल प्रिपेड रिचार्ज )
रेल्वेकडून सध्या पार्सल सेवा दिली जाते. पण, नागरिकांना त्यांच्या वस्तू, माल पाठविण्यासाठी अथवा घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर यावे लागते. पण, रेल्वेने पोस्ट खात्यासोबत मिळून त्यांची पार्सल सेवेचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोस्ट खाते व रेल्वे विभाग मिळून नागरिकांच्या वस्तू, विविध उत्पादने इच्छितस्थळी पाठवू शकणार आहेत.
या योजनेसाठी रेल्वेच्या पुणे विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, औद्योगिक कंपन्या, मार्केटयार्ड परिसरातील व्यापारी, वस्तू पाठवणारे व्यावसायिक आणि सामान्य नागरिक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून दोन आठवड्यांमध्ये काही स्थानकांवरून ही पार्सल सेवा सुरू करण्यात येणार आहे.
अशी असेल रेल्वे-पोस्टाची पार्सल सेवा
- एखाद्या व्यक्तीने पार्सल पाठवण्यासाठी नोंदणी केल्यास पोस्ट विभाग तो माल त्यांच्या कंपनीतून अथवा घरातून घेऊन तो जवळच्या रेल्वे स्टेशनवरील पार्सल विभागात देईल.
- त्यानंतर रेल्वे कार्गो विभागातून ते पार्सल संबंधित व्यक्तीच्या पत्त्यापासून जवळच्या रेल्वे स्थानकावर पाठविले जाईल.
- त्यानंतर पुन्हा त्या परिसरातील पोस्ट विभाग ते पार्सल संबंधित व्यक्तीकडे सुपूर्द करेल.