शिवसेना पक्ष कार्यालयावरून शिंदे गट व ठाकरे गटात राडा! पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना हुसकावले

136

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा शिंदे गटाने बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ताबा घेतला. याची माहिती मिळताच उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांसह शिवसैनिक कार्यालयात घुसले. त्यामुळे शिंदे गट व ठाकरे गट आमने सामने आले आणि दोघांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणाबाजी जोरात होऊ लागल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्यानंतर पक्ष कार्यलयाच्याबाहेर राज्य राखीव दलाचे जवान व पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : आता छत्तीसगडमध्ये LOVE JIHAD; शाहबादने कुसुमच्या शरीराची केली चाळण )

मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा बुधवारी सायंकाळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के,माजी नगरसेविका शितल म्हात्रे, माजी आमदार अशोक पाटील, विभागप्रमुख दिलीप नाईक, माजी नगरसेवक गिरीष धानूरकर आदींनी घेतला. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयाच्या फलकावर यशवंत जाधव यांचे नाव झाकलेली पट्टी काढून टाकली. ज्यावेळी शिंदे गटाने ताबा घेतला त्यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, श्रीकांत शेट्ये, गणेश सानप हे उपस्थित होते, परंतु त्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. त्यानंतर शेवाळे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि घोषणा देत निघून गेले.

शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यालयातून निघून जात असताना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ हे माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर व पदाधिकाऱ्यांसह तिथे पोहोचले आणि त्यांनी हे कार्यलय आमचे असून आम्ही बसणार असे सांगत आत बसले. त्याबरोबर यशवंत जाधव, आशा मामुडी यांनी पुन्हा आतमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ पुन्हा खासदार शेवाळे, म्हस्के, म्हात्रे आदींसह सर्वांनी आत प्रवेश केला आणि दोन्ही गट समोरासमोर बसले. त्यात मग दोन्ही गटांमध्ये हमरीतुमरी झाली आणि खोके… ओके अशा घोषणा ठाकरे गटाकडून होऊ लागल्या, त्याच्या प्रत्युत्तरादाखल शिंदे गटाने ए यु अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. दोन्ही गटाकडून घोषणा वाढू लागल्याने अखेर पोलिसांनी समजूत काढून बाहेर जाण्याचे आवाहन केले, पण दोन्ही गटाचे पदाधिकारी बाहेर जात नसल्याने सर्वांना बळाचा वापर हुसकावून लावत कार्यालयाचे दरवाजे लावून घेतले. यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी निघून गेले असले तरी ठाकरे गटाचे नगरसेवक तिथेच पोलिसांशी हुज्जत घालून आम्ही नेहमीच बसतो, ते आज आले असे सांगत आम्ही आत जाऊन बसतो यावर अडून बसले. पण नंतर त्यांना पोलिसांनी बाहेर काढले. त्यानंतरही महापालिका मुख्यालयाबाहेर दोन्ही गटाकडून घोषणाबाजी सुरूच होती.

खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांचे प्रेम आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करत असतात. यशवंत जाधव यांनी हे पक्ष कार्यालय बनवले असताना त्यांचे नाव झाकले जाते, हा प्रकार निंदनीय आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील बीडीडी चाळ, धारावी विकास प्रकल्प, झोपडपट्टी आणि जुन्या इमारतींचा विकास तसेच सुशोभीकरण प्रकल्प कामे हाती घेतली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.