दिवा- वसई रेल्वेमार्गावर मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

185
दिवा – वसईरोड रेल्वे मार्गावरील रुळावर लोखंडी सळई टाकून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, मोटरमनच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
दिवा- वसई रेल्वे मार्गावरील भिवंडी रोड ते खारबाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून रेल्वे रुळावर २० फूट लांब लोखंडी सळई आडवी टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान वसई रोड येथून दिवा जंक्शनकडे निघालेल्या मेमु ट्रेनच्या मोटरमनच्या हा प्रकार लक्षात आला.  मोटारमॅनने प्रसंगावधान दाखवून खारबाव ते भिवंडी रोड दरम्यान इमर्जन्सी ब्रेक दाबले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मोटारमॅनने रेल्वे रुळावर असलेली सळई ताब्यात घेऊन भिवंडी रोड रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना  याबाबत सूचना देऊन ट्रेन दिवा स्टेशनच्या दिशेने रवाना करण्यात आली.
बुधवारी रेल्वे व्यवस्थापक यांनी या घटनेची सूचना रेल्वे सुरक्षा बल यांना दिली आणि रेल्वे रुळावर सापडलेली लोखंडी सळई सुरक्षा बलाच्या ताब्यात दिली. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. भिवंडी रोड ते वसई रोड दरम्यान मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, त्या ठिकाणी बांधकामासाठी लागणाऱ्या सळईची चोरुन घेऊन जात असताना ती रेल्वे रुळात पडली असावी, अशी शक्यता रेल्वे पोलिसांकडून वर्तवली जात असून याबाबत तपास सुरू असल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.