रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सदस्यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार व अनधिकृत व्यवसायिक जाळ्यांचे बांधकाम करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे, अशा आशयाची लक्षवेधी आमदार महेश बालदी, बच्चू कडू आदिंनी उपस्थित केली होती.
या लक्षवेधीला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “पणन संचालकांमार्फत या प्रकरणाची तीस दिवसांत चौकशी केली जाईल. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तेथे बांधलेल्या गाळ्यांचे कोणालाही वाटप करणार नाही.”
( हेही वाचा: कार्यालय सील केल्याने उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या माजी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या )
सफाई कामगार वारसांच्या प्रश्नांसाठी समिती
- सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशींच्या सोबतच इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून, या समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन लाभ दिले जातील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
- सफाई कामगार वारसांच्या विषयांशी निगडीत प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन कामगार आयुक्त लाड आणि तत्कालीन सभापती पागे यांच्या समितीने केलेल्या शिफारसी शासनाने सन १९७५ ला स्वीकारल्या. त्यानंतर वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. हे सर्व शासन निर्णय एकत्रित करून लाड -पागे समितीने केलेल्या शिफारसींनुसार सफाई कामगारांना शासकीय सेवेचा लाभ देण्याबरोबरच इतर विषयांवरचा अहवाल या उपसमितीमार्फत देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
- शासकीय सेवेचा लाभ देताना सफाई कामगारांच्या वारसांच्या कामाचं स्वरूप कसे असेल? भरती प्रकिया कशी राबविता येईल? वेतन भत्ते काय असावेत? पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कामगारांच्या वारसांची नोंदणी करून घेणे, त्यांना कायमस्वरूपी निवासस्थान देणे आदि. सभागृहात सदस्यांनी सुचविलेल्या विषयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.