एमआयडीसीची जागा रहिवासी वापराकरिता परिवर्तित करून, तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी गुरुवारी विधानसभेत केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर, या संदर्भात उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून, पुढच्या अधिवेशनात सविस्तर अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे अतुल भातखळकर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, उद्योग विभागाच्या नियमानुसार ‘एमआयडीसी’ची कुठलीही जागा थेट रहिवासी वापराकरिता देता येत नाही. ती आधी व्यावसायिक करावी लागते. त्यानंतर रहिवासी वापराकरिता परावर्तित करावी लागते. पण, तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीची ४ लाख १४ हजार स्क्वेअर मीटर जागा थेट रहिवासी वापराकरता परिवर्तित केली.
(हेही वाचा – एकनाथ शिंदे शिवसेना भवन लवकरच ताब्यात घेणार, ‘या’ आमदाराच्या दाव्यानं एकच खळबळ)
या जागेचा बाजारभाव तब्बल ३ हजार १०९ कोटी रुपये इतका आहे. पण, केवळ १६८ कोटी रुपयांत ती रहिवासी वापराकरिता देण्यात आली. या माध्यमातून शासनाच्या ३ हजार कोटींच्या महसुलाची लूट करण्यात आली आहे.
२० मे २०२१ रोजी याबाबत ऑर्डर काढण्यात आली. कोरोनाकाळात एकीकडे निधीचा तुटवडा असल्याने विकासकामांना खीळ बसलेली असताना, सत्तारूढ पक्षाकडून अशाप्रकारे शासनाच्या तिजोरीची लूट सुरू होती. त्यामुळे सुभाष देसाई आणि भूषण सुभाष देसाई यांची एसआयटी चौकशी करा. ही लूट मातोश्रीपर्यंत तर पोहोचली नाही ना, याची चौकशी करा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली.
उच्चस्तरीय चौकशी होणार
अतुल भातखळकर यांनी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासंदर्भात सभागृहात दिलेल्या माहितीबाबत उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी केली जाईल. तसेच पुढच्या अधिवेशनात याचा सविस्तर अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
Join Our WhatsApp Community