मुंबईसारख्या प्रगत शहरात एका कुटुंबावर ‘सामाजिक बहिष्कार’ टाकून त्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार पश्चिम उपनगरातील बोरिवली या ठिकाणी समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकारी यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अद्याप अटक नाही
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार यांना ग्रामस्थ मंडळाने पत्र पाठवून गाव मंडळाचे न ऐकल्याबद्दल त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना ‘बहिष्कृत’ करण्याचा ठराव मंजूर केला आहे, असे ग्रामस्थ मंडळाच्या पत्रात लिहण्यात आलेले आहे. बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ पीपल फ्रॉम सोशल बाॅयकाॅट (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, २०१६ च्या कलम ३,४,५ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव
तक्रारदार ६१ वर्षीय व्यक्ती आहे, त्यांनी आरोप केला आहे की, त्याच्या सुनेने गावातील इतर तीन लोकांविरुद्ध दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने गावकऱ्यांनी आपल्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला होता. ज्येष्ठ नागरिक असलेले तक्रारदार यांनी म्हटले आहे की, गाव मंडळाने २२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले होते. या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, उपसचिव, उपखजिनदार, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. तक्रारदार यांच्या सुनेने दाखल केलेल्या विनयभंगाच्या प्रकरणातील तिघेही बैठकीत उपस्थित होते. बैठकीदरम्यान विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांवर विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तक्रार मागे न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तक्रारदाराच्या कुटुंबियांना देण्यात आली होती.
(हेही वाचा संधी असूनही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही; फडणवीसांचा टोला)
या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही
८ मे रोजी तक्रारदाराला एक पत्र मिळाले, त्यात त्यांना सांगण्यात आले की, गाव मंडळ आणि ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात ठराव केला आहे. ‘माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि मला यापुढे गावात होणाऱ्या कोणत्याही समारंभाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही’, असा लेखी आदेश मला देण्यात आला होता. मी वेळोवेळी ग्रामपरिषद आणि ग्रामस्थांचा अनादर केला आहे, असे सांगून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. ७ मे रोजी झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत मला आणि माझ्या कुटुंबाला बहिष्कृत करण्याचा निर्णय सर्व मतांनी मंजूर करण्यात आल्याचीही मला माहिती देण्यात आली होती. ‘सामाजिक बहिष्कार’ नंतर ग्रामस्थांनी ‘अमानुष पद्धतीने’ वागवण्यास सुरुवात केली, तक्रारदार यांना आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास देत असल्याचा दावा तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने केला. तक्रारदार राहण्यास असलेल्या ठिकाणी ग्रामस्थाकडून देवाची पालखी काढण्यात येते, ही पालखी ग्रामस्थाच्या प्रत्येकाच्या घरी आणली जाते. १० मे रोजी हा सण साजरा करण्यात आला आणि गावातील प्रत्येक घराजवळ थांबविण्यात येणारी पालखी तक्रारदार यांच्या घरासमोर थांबविण्यात आली नाही, असे तक्रारदाराने म्हटले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जेष्ठ नागरिक असलेल्या तक्रारदाराच्या बोरिवली पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध ठोस पुरावे सापडल्यानंतर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपींना पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community