उस्मानाबाद जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब गंभीर आहे. याप्रकरणी ४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरी, याप्रकरणी फेर चौकशी करण्यात येईल, संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत दिली.
याबाबत आमदार कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री भुमरे म्हणाले की, या प्रकरणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असून इतर नियमित दोषी अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येत आहे.
या प्रकरणी 1 कोटी 12 लाखाचा अपहार झाला आहे. संबंधिताकडून 75 लाख 70 हजार वसूल करण्यात आले असून उर्वरित रकम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत लाचलुचपत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. असे अपहार होऊ नयेत यासाठी आधार लिंक केले जात आहे. हा सर्व प्रकार उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये झाला असून बीड जिल्ह्यात पैसे उचलण्यात आले आहेत. याबाबत खातेदाराची चौकशी चालू आहे. १०० दिवसात रोजगार मिळण्यासाठी नगरपंचायतीमार्फत काम घेता येते. ज्याप्रकारे मागणी होते, त्या अनुषंगाने सर्व मजुरांना काम दिले जात आहे. अकुशल कामगारांना वेळेत पैसे उपलब्ध होत आहेत.
Join Our WhatsApp Community