उद्योग राज्याबाहेर गेल्यावरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात जे उद्योग येत होते, त्यांच्याकडे कोण टक्केवारी मागत होते, त्याची चौकशी केली जाणार असल्याचे शिंदे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा : महापालिकेच्या भूखंडावरील इमारतींच्या विकासाला गती, आखले नवीन धोरण)
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, एक कारखानदार आला होता, त्याला यांनी दीड वर्षे फिरवले. मी त्याच्यासमोर फोन केला आणि ताबडतोब काम केले. त्यामुळे अनिल अग्रवाल यांचे ट्विट देखील आले. राज्यातील एकही कारखाना दुसरीकडे जाऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ४४ हजार कोटीचे प्रकल्प एकट्या विर्दभाला दिले आहेत. त्यामुळे ४५ हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. गडचिरोली येथे खनिजांवर प्रक्रिया करणारा प्रकल्पही उभारणार आहोत.
अडीच वर्षांत त्यांनी एकाच प्रकल्पाला मान्यता मिळवली. आम्ही गेल्या सहा महिन्यांत १८ हजार कोटींच्या प्रकल्पनांना मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे उद्योग बाहेर जाण्यास कोण जबाबदार आहेत, याची माहिती समोर आणणार आहोत. शिवाय एमआयडीसीच्या जागेबाबत अतुल भातखळकर यांनी जी माहिती समोर आणली आहे, त्याचा उच्चस्तरीय समितीमार्फत तपास होणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
…तेव्हा मोदींना फोन केला
- उद्योग येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रिपरेशन असते, परवानग्या असतात. उद्योग बाहेर जाण्यासाठी जबाबदार कोण होते, हे सर्वंना ठावूक आहे.
- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी मी त्यावेळी पंतप्रधान मोदींना फोन लावला होता. तेव्हा मोदी म्हणाले की, शिंदेजी कोणताही मोठा उद्योग दोन-तीन महिन्यात इथून तिथं जात नसतो.
- तिथल्या सरकारकडून उद्योगांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना काय ठावूक होतं की, सरकार बदलणार? त्यामुळे ते उद्योग निघून गेले, असं मोदींनी आपल्याला सांगितल्याची माहिती शिंदे यांनी सभागृहात दिली.