वर्ष 2022 : राजकारणात उलथापालथ घडवून आणणाऱ्या 5 घटना

157

२०२२ वर्षात राज्यातील राजकरणात उलथापालथ घडवून आणणाऱ्या अनेक घटना घडल्या. याच वर्षात भाजपासोबत युती तोडून शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेत उभी फूट पडली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, संजय राऊत यांना अटक झाली. या अशा धक्कादायक राजकीय घटनांनी हे वर्ष राजकीय पातळीवर अस्थिर राहिले.

नवाब मलिकांना अटक 

२३ फेब्रुवारी रोजी ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी झाली. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आणखी एक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली, २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात ही मोठी घटना होती.

(हेही वाचा उद्योजकांकडे टक्केवारी मागणाऱ्यांची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा)

संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली 

राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, तेव्हा संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीचा विषय खूपच गाजला. राज्यसभेची मुदत संपल्यावर राजेंना पुन्हा खासदारकी कोण देणार हा विषय चर्चेला आला. राजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करून त्यासाठी शिवसेनेला पाठिंबा मागितला, मात्र शिवसेनेने त्यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी मागणी केली. या पेचात दिवस निघून गेले. आणि उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख येताच शिवसेनेने अखेर राजेंना पाठिंबा न देता त्यांनी संजय पवार यांना उमेदवारी दिली. २७ मे २०२२ रोजी राजेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची स्पष्ट भूमिका मांडली. या वर्षातील ही लक्षवेधी घटना होती.

शिवसेनेत उभी फूट 

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपने यश मिळवल्यानंतर ठाकरे सरकारवर मोठे संकट आले. शिवसेनेचे गटनेते असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील २२ आमदार फोडून २१ जून २०२२ रोजी थेट सूरत गाठली. त्यांनतर ते गुवाहाटीला गेले, तोवर शिवसेनेचे ४० आमदार यांनी शिंदे यांना समर्थन दिले. पुढे ही फूट गल्लीपासून दिल्लीपर्यंत पडली. ११ खासदार शिंदे गटात गेले, शाखाप्रमुख, विभागप्रमुख फुटून शिंदे गटात गेले. अशा प्रकारे शिवसेनेत उभी फूट पडली. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव चिन्ह गोठवले आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आणि पेटती मशाल ही चिन्ह देण्यात आले.

(हेही वाचा आटपाडीत ख्रिस्त्री धर्मांतराचे कारस्थान; आमदार पडळकरांनी मांडली लक्षवेधी)

महाविकास आघाडीचे सरकार कोसळले

राज्यसभा आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्यावर आणि भाजपचे उमेदवार निवडून आल्यामुळे अस्वस्थ झालेले त्यावेळीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच आमदारांची बैठक बोलावली, मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे १६ आमदार सोबत घेऊन सुरतचा रस्ता पकडला. तेथून पुढे गुवाहाटीला गेले, त्या दरम्यान शिंदे यांच्याकडे १६ वरून ४० शिवसेनेच्या समर्थक आमदारांची संख्या झाली. अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाली, परिणामी महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले. त्यांनतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी केली. त्यावेळी बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

संजय राऊत यांना अटक

१ ऑगस्ट २०२२ रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची सुमारे ८ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि अखेर त्यांना ईडीने अटक केली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन करण्यामागे मुख्य सूत्रधार संजय राऊत होते. त्यानंतर भाजपवर अत्यंत विखारी टीका करण्यात संजय राऊत कायम तयार असायचे, त्यांना अटक करून भाजपने मविआ सरकारला धक्का दिला होता. देशमुख, मलिकांनंतर माविआतील राऊत हे तिसरे नेते होते ज्यांना अटक करण्यात आली.

(हेही वाचा मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी शिझानचा तुनिषावर दबाव! आईचा गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.